पुणे शहर पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : पुणे शहर पोलीस दलातील तपास पथकाचे प्रमुख असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने लोणावळ्यात झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने अचानक टोकाचे पाऊल उचलल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. मात्र, लोणावळा पोलिसांना याबाबत विचारले असता त्यांनीही माहिती देण्यास टाळाटाळ केली. अण्णासाहेब बादशाह गुंजाळ (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आण्णा गुंजाळ हे खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ते खडकी पोलिसांच्या तपास पथकाचे प्रमुख अधिकारी होते. तीन दिवसांपासून ते गैरहजर होते. पोलीस ठाण्यात येत नसल्याने त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला होता. पण, संपर्क होऊ शकला नव्हता. दरम्यान, सलग चौथ्या दिवशी गैरहजर राहिल्याने तसेच त्यांचा काहीच संपर्क होत नसल्याने स्थानिक पोलीस त्यांची मिसींग दाखल करण्याच्या तयारीत होते. मात्र, त्याचवेळी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधला. गुंजाळ यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कळविले. लोणावळा येथील टायगर पाँईटला त्यांनी एका झाडाला गळफास घेतल्याचे समोर आले आहे. त्यांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून केली हे समजू शकलेले नाही. परंतु, अधिक माहिती देण्यास लोणावळा ग्रामीण पोलिसांनी टाळाटाळ केली. आण्णा गुंजाळ यांचा विवाह झालेला आहे. त्यांना दोन जुळी मुलं आहेत. त्यांच्या अशा जाण्याने कुटूंबासह पोलीस दलावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.