महाराष्ट्र

रात्री मद्यपान करून धुडगूस घालणाऱ्या टवाळखोरांवर नाशिक पोलिसांची कारवाई

नाशिक : शहरातील मोकळे मैदान, बगीचे, जॉगिंग ट्रॅक आदी परिसरात मद्यपान करून धुडगूस घालणाऱ्या टवाळखोरांकडे पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. अलीकडेच गंगापूर रस्त्यावर बेधुंद युवक, युवतींनी हुज्जत घालत पोलिसांशी गैरवर्तन केले होते. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी रात्री विशेष मोहीम राबवत उघड्यावर मद्यपान करणाऱ्या ९५ टवाळखोरांवर कारवाई केली. ही कारवाई हाती घेतली असली तरी रात्री उशिरापर्यंत चालणारे क्लब, हॉटेल, बिअरबार, पानटपरी, स्पा आदींकडे भाजपच्या शिष्टमंडळाने लक्ष वेधले आहे. गंगापूर रस्त्यावर रात्री उशिरा मद्यधुंद युवक-युवतींनी पोलिसांनी हुज्जत घातल्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. युवावर्ग नशेच्या अधीत होत असून गोदापार्क, उद्याने, शाळा-महाविद्यालयांच्या आसपासचा परिसर नशागिरीचे अड्डे झाले असून संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. अनेक इमारतीलगतच्या जागेत अनधिकृत बांधकामे करून हॉटेल उभारली गेली. त्या ठिकाणी चालणारे गैरप्रकार बंद करावेत, शहरातील सीसीटीव्ही तत्काळ कार्यान्वित करावेत, मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपने केली.

गंगापूर रस्त्यावरील प्रकारानंतर पोलीस यंत्रणेला जाग आली. मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्यांवर रात्री १० ते १२ या वेळेत कारवाईचे सत्र आरंभण्यात आले. परिमंडळ एकच्या कार्यक्षेत्रातील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या कारवाईत उघड्यावर मद्यपान करणाऱ्या ९५ टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली. पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त नितीन जाधव आणि सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी, अंमलदार यांनी ही कारवाई केली. नाशिक परिमंडळ एकमध्ये ९५ टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये आडगाव पोलीस ठाणे १०, म्हसरूळ ११, पंचवटी २७, सरकारवाडा चार, भद्रकाली १६, मुंबई नाका १५ आणि गंगापूर १२ जणांचा समावेश आहे.

गंगापूर रस्त्यावरील क्लबबाहेर मद्यधुंद युवतीने पोलिसांशी हुज्जत घातली होती. या प्रकरणी संशयित युवतीविरुद्ध गुन्हा न दाखल केल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गंगापूरचे वरिष्ठ निरीक्षक सुशिल जुमडे यांची उचलबांगडी केली. त्यांना नियंत्रण कक्षात नियुक्ती देण्यात आली. त्यांच्या जागी प्रभारी म्हणून जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्याकडे कारभार सोपविण्यात आला. दरम्यान, मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणे, पोलिसांशी अरेरावी करणे युवकांना चांगलेच महागात पडले. या घटनेची चित्रफित प्रसारित झाली होती. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणणे, पोलिसांशी अरेरावी केल्या प्रकरणी मयूर साळवे (३०, सिडको), वैशाली वाघमारे (३२, नाशिकरोड), भूमी ठाकूर (१९, भाभानगर), अल्तमश शेख (२०, वडाळा गाव), हॉटेल चालक राकेश जाधव (३१, अशोकनगर) आणि दोन बाउन्सरविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button