वन डे मालिकेत दीपोत्सव – अर्शदीप सिंहच्या भन्नाट माऱ्यामुळे हिंदुस्थानने सामन्यासह मालिकाही जिंकली

वृत्तसंस्था : दक्षिण आफ्रिकेतील वन डे मालिकेत हिंदुस्थानने चक्क दीपोत्सव साजरा केला. पहिल्या वन डेत अर्शदीपने ३७ धावांत ५ विकेट घेत आफ्रिकन संघाचा अवघ्या ११६ धावांत खुर्दा पाडला होता. तर तिसऱया वन डेत हिंदुस्थानच्या २९७ धावांचा पाठलाग करताना यजमानांनी २ बाद १४१ अशी चांगली धावसंख्या उभारत सामन्यात चुरस निर्माण केली होती, पण अर्शदीपने टोनी झॉर्झीचा पायचीत करत सामन्याला कलाटणी देणारे यश मिळवले आणि आफ्रिकन डावाला एकापाठोपाठ तीन हादरे देत त्यांचा डाव २१८ धावांत संपवण्याचा करिश्मा करून दाखवला.
अर्शदीपने ३० धावांत ४ विकेट घेत हिंदुस्थानला ७८ धावांनी विजयच मिळवून दिला नाही, तर तीन सामन्यांची वन डे मालिकाही २-१ ने जिंकून दिली. शतकवीर संजू सॅमसन ‘सामनावीर’ ठरला असला तरी मालिकेत १० विकेट टिपणारा अर्शदीपच ‘मालिकावीर’ ठरला.
टोनीची एकाकी झुंज
संजू सॅमसनची 108 धावांची दिमाखदार खेळी आणि त्याला तिलक वर्माची (५२) लाभलेली साथ यामुळे हिंदुस्थानने ७ बाद २९६ अशी दमदार मजल मारत दक्षिण आफ्रिकेला चांगले आव्हान दिले होते. दुसऱया सामन्यात टोनी झॉर्झीने शतक ठोकत दक्षिण आफ्रिकेला मालिकेत बरोबरी साधून दिली होती. त्यात झॉर्झीने आजही आपल्या फलंदाजीचा तडाखा हिंदुस्थानी गोलंदाजांनी दिला. सलामीवीर रीझा हेंड्रिक्ससह टॉनीने ५९ धावांची सलामी दिली, पण रीझा लवकर बाद झाला. रॅसी वॅन डर डय़ुसनने निराशा केली. तेव्हा टोनी लढला. त्याने एडन मार्करमच्या साथीने तिसऱया विकेटसाठी ६५ धावांची भागी रचताना दक्षिण आफ्रिकेला टॉप गिअरवर ठेवले होते. पण वॉशिंग्टन सुंदरने मार्करमला बाद करून ही जोडी फोडली आणि मग अर्शदीपने टोनीचा खेळ थांबवत आफ्रिकेच्या विजयाच्या प्रयत्नांनाही सुरुंग लावला. टोनी सलग दुसऱया शतकाच्या उंबरठय़ावर होता. त्याने ६ चौकार आणि ३ षटकारांसह ८२ धावा केल्या होत्या, पण शतकापूर्वीच तो अर्शदीपच्या जाळय़ात अडकला आणि सारा डावच पलटला. टोनीनंतर आफ्रिकेचा डाव गुंडाळायला अर्शदीप आणि टीमला फार वेळ लागला नाही.