‘अजित पवारांनी पक्षात वर्षानुवर्षे दादागिरीच केली’ जितेंद्र आव्हाडांची जहरी टीका
मुंबई : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करताना दिसून येत आहे. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघावर हक्क दाखवून याठिकाणावरून आपला उमेदवार निवडून आणणार असल्याचा शड्डू ठोकला आहे. त्यांच्या या निर्धारावर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना आव्हान दिले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हेंविरोधात उमेदवार उभा करणार असल्याचा थेट इशारा अजित पवारांनी दिला होता. यामुळे अमोल कोल्हे आणि अजित पवार यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झालं. दरम्यान अजित पवार यांच्या इशाऱ्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.
‘अजित पवार यांचा धमक्या देण्याचा स्वभाव पूर्वीपासूनचा आहे. ते उघड धमक्या देतात हे जनतेला दिसून येत आहे. त्यांनी आजपर्यंत तेच केलं आणि शरद पवारांची जवळची चांगली चांगली माणसं त्यांनी तोडून टाकली. ही त्यांची दादागिरी आहे. वर्षानुवर्षे त्यांनी पक्षात दादागिरीच केली.’
ते पुढे म्हणाले,’अजित पवारांनी निर्माण केलेली दहशत आणि दरारा याचा त्यावेळेस मी बळी पडलो. एकिकडे अजित पवार यांच्याकडून त्रास दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडून होणारी अडवणूक यामुळे मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. म्हणजे खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वात वाईट अवस्था माझी होती.’