शिरूर मतदारसंघावर अजितदादांचा दावा, शिंदे गटही आग्रही
पुणे : मागील लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला पराभव पत्करावा लागलेल्या लोकसभा मतदार संघांमधील निकाल आगामी निवडणुकांमध्ये बदलण्यासाठी भाजपने सुरू केलेल्या ‘मिशन १४४’मधील शिरुर या मतदार संघात भाजपची कोंडी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असलेल्या या मतदार संघात भाजपची ताकद वाढविण्यासाठी भाजपचे केंद्रीय नेत्यांचे दौरे होत असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मतदार संघावर दावा करून भाजपचे ‘मिशन शिरुर’ अडचणीत आणले आहे. तसेच शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याच्या चर्चेने या मतदार संघात महायुतीत तिढा निर्माण झाला आहे.
या परिस्थितीत शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानाला येत्या शनिवारपासून (सहा जानेवारी) शिरूरपासूनच प्रारंभ होत आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकसभेचे रणशिंग फुंकणार असून, त्यामध्ये ते कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यातील शाब्दिक चकमकीनंतर हा मतदारसंघ चर्चेत आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘शिरूरमधून मी दिलेला उमेदवार निवडून आणून दाखवणारच, असे वक्तव्य करीत डॉ.कोल्हे यांना आव्हान दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर कोल्हे यांनीही प्रतिआव्हान देत खासगीतील कोणतीही चर्चा सार्वजनिक करणार नाही. मात्र, ‘बात निकली है तो दूर तक जाएगी…’ असे उत्तर दिल्याने या मतदारसंघातील वातावरण तापले आहे.
आता या मतदारसंघातून अजित पवार हे उमेदवार शोधण्याच्या तयारीत असून सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देऊन तगडे आव्हान उभे केले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार कोणता उमेदवार देणार, याबाबत या मतदारसंघात उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘मी दिलेला उमेदवारच निवडून येणार’ या अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे भाजपचे ‘मिशन शिरूर’ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांचेही स्वप्न भंग होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानाचे मेळावे दोन टप्प्यांत होणार आहेत. त्यातील पहिला टप्पा ६ जानेवारी रोजी शिरूर येथून सुरू होणार असून, ११ जानेवारीला छत्रपती संभाजीनगर येथील मेळाव्याने पहिल्या टप्प्यातील प्रचार पूर्ण केला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्याला २५ जानेवारीपासून पुन्हा सुरुवात होणार आहे. शिरुरमध्ये होणाऱ्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोणती भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
भाजपच्या ‘मिशन १४४’नुसार गेल्या निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागलेल्या देशातील १४४ लोकसभा मतदारसंघांवर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये राज्यातील ४५ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. राज्यातील ‘मिशन ४५’ मध्ये पुणे जिल्ह्यातील शिरुर आणि बारामती हे दोन मतदारसंघ आहेत. या मतदारसंघांमध्ये केंद्रीय मंत्र्यांचे दौरे झाले आहेत. प्रत्येक मतदारसंघासाठी निरीक्षक नेमण्यात आला आहे. संबंधित निरीक्षक हाच आगामी लोकसभा निवडणुकीचा संभाव्य उमेदवार असेल अशी रचना करण्यात आली आहे. त्यानुसार शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र अजित पवार हे महायुतीत सहभागी झाल्याने आणि शिरूरमध्ये आपलाच शब्द अंतिम असणार, हे स्पष्ट केल्याने आमदार महेश लांडगे यांच्यापुढे अडचण निर्माण झाली आहे.
गेला लोकसभा निवडणुकीमध्ये माजी खासदार शिवाजीराव पाटील यांचा डॉ. अमोल कोल्हे यांनी पराभव केला होता. आढळराव पाटील हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. शिरूर, जुन्नर, आंबेगाव, खेड- आळंदी, हडपसर आणि भोसरी या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश या मतदारसंघात होतो. त्यापैकी भोसरी मतदार संघ हा भाजपकडे आहे. शिरूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. उर्वरित चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये अजित पवारसमर्थक आमदार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचा शब्द अंतिम असणार आहे. आढळराव पाटील हे अजित पवार गटात येण्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक समजले जातात. त्यामुळे आढळराव पाटील हे नक्की कुणाचे, अशी संभ्रमावस्था कार्यकर्त्यांमध्ये झाली आहे. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.