गुन्हे

शरीरात ६ कोटींचे कोकेन लपवणाऱ्या व्हेनेझुएलाच्या नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक

मुंबई : परदेशातून अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्या जातात. शरीरामध्ये तब्बल सहा कोटी २० लाख रुपयांचे कोकेन लपवत त्याची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर अटक केली आहे.

तो व्हेनेझुएला देशाचा नागरिक असून अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाच्या अनुमतीने त्याला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

डीआरआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हेनेझुएला येथून एक व्यक्ती अमली पदार्थांची तस्करी करत ते मुंबईत आणत असल्याची विशिष्ट माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार ती व्यक्ती मुंबईत येत असलेल्या विमानाच्या बाहेर अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. विमानातून उतरलेल्या एका व्यक्तीचा हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे त्याला बाजूला घेण्यात आले. सर्वप्रथम त्याच्या सामानाची झडती घेतली असता त्यात अमली पदार्थ आढळून आले नाही.

शस्त्रक्रिया करून काढल्या ५७ कॅप्सूल
* चौकशीदरम्यान त्याने स्वत:च्या शरीरात कोकेनच्या ५७ कॅप्सूल लपविल्या असल्याची कबुली दिली.
* रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या शरीरातून या कोकेनच्या कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या.
* या कोकेनचे वजन ६२८ ग्रॅम असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सहा कोटी २० लाख रुपये इतकी आहे.
* अटक केलेली व्यक्ती केवळ हँडलर आहे की, त्याच्यामागे कोणती टोळी सक्रिय आहे, तसेच मुंबईत तो हे कोकेन कुणाला देणार होता, याचा तपास अधिकारी करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button