दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ ठाकरे– शिंदे गटातील लढतीत कोण बाजी मारणार
मुंबई : दादर, माहिम, धारावी, शीव, अणुशक्तीनगर, चेंबूर असा विस्तीर्ण पसरलेला दक्षिण मध्य मुंबई हा मतदारसंघ पारंपारिकदृष्ट्या शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी शिवसेनेतील बंडानंतर या मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याने ठाकरे गट शिवसेनेचे शिवसेना भवन हे मुख्यालय असलेल्या मतदारसंघातील जागा कायम राखण्यासाठी जोर लावणार हे निश्चित. ठाकरे आणि शिंदे गटातील लढाई अटीतटीची होण्याची चिन्हे असून त्यात कोण बाजी मारते याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
दादर, माहिम, धारावी या भागांचा समावेश असलेला उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ म्हणून ओळखला जात असे. २००९ मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर त्याचे नाव दक्षिण मध्य मुंबई असे झाले. तसेच मतदारसंघाचा आकारही बदलला. या मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व होते. विद्याधर गोखले, नारायण आठवले, मनोहर जोशी, राहुल शेवाळे या शिवसेनेच्या खासदारांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये शिवसेनेचे राहुल शेवाळे हे विजयी झाले होते. शिवसेनेतील फुटीनंतर शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामुळेच शेवाळे यांचा पराभव करण्याचा निर्धार ठाकरे गटाने केला आहे.
शिवसेना शिंदे गट, भाजप या महायुतीकडून पुन्हा राहुल शेवाळे हे उमेदवार असणार हे निश्चित आहे. महाविकास आघाडीत ठाकरे गटाचा हक्क असला तरी काँग्रेसने या जागेवार दावा केला आहे. धारावीचा पुनर्विकास हा या मतदारसंघातील कळीचा मुद्दा. धारावीच्या पुनर्विकासाचे काम अदानी कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. धारावीतील नागरिकांच्या पुनर्वसनावरून सध्या वाद सुरू झाला आहे. गेल्याच महिन्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाने अदानी कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. यानंतर अदानी कंपनी आणि राज्य सरकारला खुलासे करावे लागले. धारावी विधानसभा मतदारसंघ हा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचा बालेकिल्ला. धारावी प्रकल्पावरून स्थानिकांमध्ये संभ्रम आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी पुनर्विकासाचे समर्थन केल्याने त्यांच्याबद्दल धारावीत एका वर्गात नाराजीची भावना आहे.
या मतदारसंघात धारावीचा पुनर्विकास हा महत्त्वाचा मुद्दा असेल. धारावीचा कौल मतदारसंघात निर्णायक ठरू शकतो. शिवसेनेच्या ठाकरे गटाने धारावीतील नागरिकांना मोठी घरे मिळाली पाहिजेत आणि सर्वांचे त्याच जागेत पुनर्वसन झाले पाहिजे या मागणीसाठी मोठा मोर्चा काढला होता. धारावीत ठाकरे गटाला हा मुद्दा राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. धारावीतील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी अलीकडेच शिंदे गटात प्रवेश केला. धारावी पुनर्विकासावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. त्याचा लाभ उठविण्यासाठी ठाकरे तसेच शिंदे गट दोघेही प्रयत्नशील आहेत. या मतदारसंघात मनसेची ताकद आहे. दादर, माहिम या पट्ट्यात मनसेची पाळेमुळे रोवलेली आहेत. मनसे कोणाला पाठिंबा देणार त्याचा फायदा होऊ शकतो.
धारावी, अणुशक्तीनगर, शीव-कोळीवाडा, वडाळा या भागातील संमिश्र वस्ती व अल्पसंख्याक मतदारांचे प्रमाण लक्षात घेता काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला आहे. कारण २००४ मध्ये याच मतदारसंघात लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष मनोहर जोशी यांचा काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांनी पराभव केला होता. २००९ मध्येही गायकवाड विजयी झाले होते. पण २०१४ आणि २०१९ मध्ये मोदी लाटेत गायकवाड पराभूत झाले. फुटीनंतर शिवसेना ठाकरे गट कमकुवत झाल्याने काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्याची मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. शिंदे आणि ठाकरे गटात लढत झाल्यास मुंबईतील या दोन गटांतील कडवी झुंज असेल. शिवसेनेतील फुटीनंतर या मतदारसंघात ठाकरे गटाला मोठे धक्के बसले आहेत. पण मतदारांची सहानुभूती ठाकरे गटाकडे असल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे.
माहिम – सदा सरवरणकर (शिवसेना शिंदे गट), चेंबूर – प्रकाश फारतपेकर (ठाकरे गट), धारावी – वर्षा गायकवाड (काँग्रेस), सायन- कोळीवाडा – आर. तमिळ सेल्वन (भाजप), वडाळा – कालिदास कोळंबकर (भाजप), अणुशक्तीनगर – नवाब मलिक (राष्ट्रवादी)
राहुल शेवाळे (शिवसेना) : ४,२४,९१३ एकनाथ गायकवाड (काँग्रेस) : २,७२,७७४