भाजपकडून सहा मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याच्या हालचाली सुरू
मुंबई : भाजपकडून सहा मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याच्या हालचाली सुरू आहेत. राज्यातील या ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी दिल्यास ते मतदारसंघ जिंकणे सोपे जाईल आणि या नेत्यांनाही राष्ट्रीय राजकारणात जाण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुणे, गिरीश महाजन यांना जळगाव, अतुल सावे यांना छत्रपती संभाजीनगर, सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर, रवींद्र चव्हाण यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग, राधाकृष्ण विखे-पाटील यांना नगर येथून उमेदवारी देण्याबाबत विचार सुरू आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची राज्यसभेची मुदत संपत असून त्यांना आता रत्नागिरी, सिंधुदुर्ग किंवा मुंबईतून निवडणूक लढविण्याचा पर्याय दिला जाण्याची शक्यता आहे.
भाजप पक्षश्रेष्ठींनी गेल्या एक-दीड वर्षात झालेल्या काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये वेगळा विचार करून धक्कातंत्र राबविले. मुख्यमंत्री पदासाठीही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. त्या धर्तीवर आता राज्यातील ज्येष्ठ नेत्यांना दिल्लीच्या राजकारणात पाठविले जाणार आहे. राज्यसभेच्या काही जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या असून भाजपचे नारायण राणे, प्रकाश जावडेकर आणि मुरलीधरन यांची मुदत संपत आहे. या तिघांनाही पुन्हा संधी मिळणार नाही. राणे यांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्याचा विचार सुरू आहे. तावडे यांच्यावर पक्षाने विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. त्यांना भाजपसाठी सुरक्षित अशा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. पण त्यांना एका लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारात अडकविण्यापेक्षा संघटनात्मक वापर करून राज्यसभेची उमेदवारी द्यावी, या पर्यायावर विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.