भारत

माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव, चरणसिंह आणि एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर

वृत्तसंस्था : माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्यासह माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडवणारे डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स अकाऊंटवरून याची घोषणा केली.

यंदाचे वर्ष निवडणुकांचे असून आचारसंहिता लागण्यापूर्वी मोदी सरकारने घोषणांचा धडाका लावला आहे. त्यात अवघ्या एका महिन्यात पाच भारतरत्न पुरस्कारांची लयलूट करण्यात आली आहे. यातून मोदींचे विविध राज्यांत राजकीय गोळाबेरीज साधण्याचे गणित असल्याचे दिसत आहे. यापूर्वी मोदी सरकारने बिहारचे जननायक अशी ओळख असलेल्या बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांच्या नावाची घोषणा केली. याआधी १९९९ मध्ये चार जणांना भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली होती, तर यंदा तब्बल पाच जणांच्या नावांची घोषणा करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत सर्वाधिक संख्येने भारतरत्न मोदी सरकारच्या काळात देण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचा धागा पकडून विविध राज्यांमधील राजकीय समीकरणे सोडवण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने भारतरत्न पुरस्कारांसाठी नावांची घोषणा केल्याचे बोलले जात आहे.

शेतकऱयांचे तारणहार म्हणून चौधरी चरणसिंग यांची ओळख होती. चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न दिल्याने पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा आणि दिल्लीतील जाटबहूल जागांवर मोदी सरकारला फायदा मिळू शकतो. या भागांमध्ये लोकसभेच्या तब्बल ४० जागा असून येथे जाट मतदारांचा प्रभाव सर्वाधिक असल्याचे चित्र आहे. हे व्हिजन चौधरी चरणसिंग यांच्या नावाची घोषणा करताना मोदी सरकारने समोर ठेवल्याचे दिसते.

कृषी शास्त्रज्ञ म्हणून एमएस स्वामीनाथन यांनी मिळवलेले यश अतुलनीय आहे. दक्षिण हिंदुस्थानातील प्रज्ञावंतांच्या यादीत त्यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे त्यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर करून दक्षिण हिंदुस्थानला आणि शेतकऱयांना आकर्षित करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे.

उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी हे राम मंदिर आंदोलनातील मोठा चेहरा आहेत. असे असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी राम मंदिर उद्घाटनाच्या वेळी केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून आणि आगामी लोकसभा निवडणुकीत आडवाणींच्या योगदानाचा वापर करण्याच्या हेतूने राम मंदिर उद्घाटनाच्या १० दिवसांनंतरच भारतरत्न पुरस्कारासाठी आडवाणींच्या नावाची घोषणा करण्यात आली.

बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर हे सामाजिक न्यायाचे नायक होते. बिहारमध्ये मागासांचे ३६ टक्के तर अतिमागासवर्गीयांचे २७ टक्के प्रमाण आहे. कर्पुरी ठाकूर यांचा ६३ टक्के समाजावर मोठा प्रभाव आहे. हा समाज त्यांना आपला नायक मानतो. त्यांचा लोकसभा निवडणुकीत पाठिंबा मिळवण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने भारतरत्नसाठी कर्पुरी ठाकूर यांच्या नावाची घोषणा केली. कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा झाल्यानंतर अवघ्या ८  दिवसांनी भाजप आणि जदयु पुन्हा एकत्र आल्याचे चित्र दिसले.

नरसिंहराव यांचा जन्म १९२१ मध्ये आंध्र प्रदेशातील करिमनगर येथे झाला. त्यांनी २१ जून १९९१  ते १६ मे १९९६ पर्यंत देशाचे पंतप्रधानपद भूषविले. नरसिंहराव यांना देशाच्या आर्थिक सुधारणांचे जनक म्हणून संबोधले जाते. त्यांना अनेक भाषा अवगत होत्या.

चौधरी चरण सिंह यांचा जन्म १९०२ साली उत्तर प्रदेशातील मेरठ येथे झाला. २८ जुलै १९७९ ते १४ जानेवारी १९८० पर्यंत त्यांनी देशाचे पंतप्रधानपद भूषविले आहे. ते उत्तर प्रदेश राज्याचे दोन वेळा १९६७ आणि १९७० मध्ये मुख्यमंत्री राहिले.

एम. एस. स्वामीनाथन यांचा जन्म ७  ऑगस्ट १९२४ ला तामीळनाडूमध्ये झाला. १९७२  आणि १९७९ यादरम्यान डॉ. स्वामीनाथन यांनी भारत सरकारमध्ये कृषी अनुसंधान आणि शिक्षण विभागाचे सचिव म्हणून काम केले. १९६७ मध्ये पद्मश्री, १९७२ मध्ये पद्मभूषण आणि १९८९ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच हिंदुस्थानचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करतात, असा टीकेचा सूर विरोधकांचा असतो, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संसदेत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे तोंडभरून कौतुक केले. ते व्हीलचेअरवरूनही लोकसभेत येत राहिले आणि लोकशाहीला बळ देत राहिले असे त्यांनी म्हटले होते. दुसऱयाच दिवशी नरसिंह राव यांच्या नावाची घोषणा मोदी यांनी केली.

राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख जयंत चौधरी हे एनडीएत सहभागी होणार असल्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. सरकारच्या घोषणेनंतर जयंत चौधरी भावूक झाले. या पुरस्काराबद्दल जयंत चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. रालोद सध्या समाजवादी तसेच पर्यायाने इंडिया आघाडीसोबत आहे, परंतु गेल्या काही दिवसांपासून ते भाजपशी हातमिळवणी करतील आणि एनडीएत सहभागी होतील अशा बातम्या प्रसारित होत होत्या. प्रसारमाध्यमांनी त्यांना याबाबत विचारल्यानंतर मोदी सरकारने मन जिंकले, आता कुठल्या तोंडाने मी नकार देऊ, असे उत्तर दिले. तर जयंत चौधरी इंडिया आघाडी सोडून कुठेही जाणार नाहीत. या इंडिया आघाडीतील नेत्यांच्या वक्तव्याबद्दल विचारले असता मी दोन्ही बाजूचे दरवाजे उघडे ठेवले आहेत, असे उत्तर दिले.

भारतरत्न हा हिंदुस्थानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. एका वर्षात जास्तीत जास्त तीन व्यक्तींना भारतरत्न दिला जाऊ शकतो, असा नियम आहे. मात्र मोदी सरकारने २०२४ या एका वर्षात पाच जणांना हा पुरस्कार जाहीर केला. १९९९ मध्ये चार व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता.

हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱया मोदी सरकारला पुन्हा एकदा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण झाले. एका महिन्यात पाच नेत्यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात आले. पण त्यात ना वीर सावरकर ना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, असे ट्विट शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. नियम असा आहे की एका वर्षात जास्तीत जास्त तीन भारतरत्न देता येतात. मोदींनी एका महिन्यात पाच भारतरत्न जाहीर केले. निवडणुकांची धामधूम… दुसरे काय? कर्पुरी ठाकूर, लालकृष्ण आडवाणी यांच्यानंतर आता चौधरी चरणसिंह, पी.व्ही. नरसिंह राव आणि एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्नने सन्मानित केले. आणखी काही नेते प्रतीक्षेत आहेत. पण ज्यांनी सारा भारत हिंदुमय केला, ज्यांच्यामुळे मोदी अयोध्येत राम मंदिर सोहोळा करू शकले, त्या बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण का, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button