महाराष्ट्र

पालिका प्रशासनाने रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणासाठी आणखी सहा हजार कोटींच्या निविदा मागवल्या

मुंबई : रस्त्यांच्या कॉंंक्रीटीकरणाची आधीच्या कंत्राटातील कामे रखडलेली असताना पालिका प्रशासनाने आणखी हजारो कोटींच्या कामांसाठी निविदा मागवल्या आहेत. यामध्ये शहर भागासाठी एक, पूर्व उपनगरासाठी एक व पश्चिम उपनगरासाठी तीन निविदा मागवण्यात आल्या आहेत. ही कामे सुमारे सहा हजार कोटींची आहेत.

येत्या दोन वर्षात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा संकल्प सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला सर्व रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्याचे निर्देश दिले होते. ६,०७८ कोटींच्या कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यातून पाच नामांकित कंत्राटदारांची निवड करण्यात आली व जानेवारी महिन्यात कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले. जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले होते. ही रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. ९१० पैकी केवळ ११ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तर शहर भागातील रस्ते कंत्राटदाराने एकही काम सुरू न केल्यामुळे त्याचे कंत्राट रद्द करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानंतर नुकतेच शहर भागातील रस्त्यांच्या कामांसाठी १३६२ कोटींच्या नव्याने निविदा मागवण्यात आल्या आहेत. ही निविदा प्रक्रिया सुरू असताना आता पुन्हा एकदा संपूर्ण मुंबईतील ४०० किमी रस्त्यांच्या कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. ही सगळी कामे एकाच वेळी सुरू झाल्यास मुंबईत वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या निवडणुकीआधी उर्वरित रस्ते कंत्राटे देऊन त्याचे भूमिपूजन करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडत असल्यामुळे पालिकेने रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्याचा दीर्घकालीन कार्यक्रम हाती घेतला होता. त्याअंतर्गत दरवर्षी टप्प्याटप्प्याने रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरण केले जात होते. मुंबई एकूण सुमारे २०५० किमीचे रस्ते असून त्यापैकी १२२४ किमी रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात पालिकेने २३६ किमीची २२०० कोटींची कामे हाती घेतली होती. पालिकेची मुदत संपण्याआधी या कामांना मंजुरी देण्यात आली होती. ही कामे ऑक्टोबर २०२२ पासून सुरू झाली होती. ती कामे अद्यापही सुरू आहेत. त्यातच राज्यात गेल्यावर्षी सत्तापालट झाल्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये पुन्हा एकदा ३९७ किमीच्या ९१० रस्त्यांच्या कामांसाठी ६,०७८ कोटींच्या म्हणजेच प्रथमच मोठ्या प्रमाणावर निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र हे वर्ष संपत आले तरी ही कामे सुरूच न झाल्यामुळे मोठा वाद झाला होता. आता पुन्हा एकदा सुमारे सहा हजार कोटींच्या कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

शहर ….११४२ कोटी ४ लाख रुपये

पूर्व उपनगर …..१२९७ कोटी ३९ लाख

पश्चिम उपनगर …..८६४ कोटी २७ लाख रुपये

पश्चिम उपनगर………१४०० कोटी ७३ लाख रुपये

पश्चिम उपनगर……..१५६६ कोटी६५ लाख रुपये

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button