महाराष्ट्र

सात वर्षांनी उघडलं मुंबईतल्या सर्वात दिमाखदार ‘इरॉस’ या सिनेमागृहाचं दार

मुंबई : इरॉस हे मुंबईतल्या चर्चगेट भागात असलेलं एक सुप्रसिद्ध सिनेमागृह. या सिनेमागृहाची डागडुजी सुरु होती. त्यामुळे एक दोन नाही तब्बल सात वर्षे हे सिनेमागृह बंद होतं. तसंच २०१७ मध्ये तिकिट विक्रीतही प्रचंड घट झाली होती. चर्चगेट स्टेशनच्या समोर दिमाखात उभं असलेलं इरॉस थिएटर सात वर्षांनी उघडलं आहे. मुंबईतल्या सर्वात सुंदर सिनेमागृहांपैकी एक असलेल्या इरॉस सिनेमागृहाला नवी झळाळी प्राप्त झाली आहे.

इरॉस सिनेमा हॉलच या ठिकाणी आता तंत्रज्ञानाने सुस्सज असलेला आयमॅक्स सिनेमा सुरु झाला आहे. शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन यांचा ‘तेरी बातोमें ऐसा उलझा जिया’ या चित्रपटाच्या खेळाने या सिनेमागृहाचं दार पुन्हा उघडलं आहे. २०१७ नंतर सात वर्षांनी इरॉस सिनेमागृहात सिनेमा पाहता येणार आहे. इरॉस आयनॉक्स आयमॅक्स सिनेमा असं या सिनेमागृहाचं नाव आता झालं आहे. तसंच ‘फायटर’ या सिनेमाचे शो देखील या ठिकाणी सुरु आहेत.

चर्चगेट स्टेशनच्या समोर आपल्या खास स्थापत्य वास्तूशैलीत उभं असलेलं इरॉस थिएटर हे दक्षिण मुंबईची शान असलेलं सिनेमागृह आहे. इंग्रजांच्या काळापासून या सिनेमाची इमारत उभी आहे. मात्र २०१७ पासून हे सिनेमागृह बंद झाल्याने प्रेक्षक हळहळले होते. जे आता हे सिनेमागृह सुरु झाल्याने सुखावले आहेत. मुंबईतल्या अत्यंत पॉश भागातलं हे पहिलं आयमॅक्स सिनेमागृह आहे. या ठिकाणी आयमॅक्स तंत्राने सिनेमा पाहता येणार आहे. ३०० आसनांची क्षमता असलेलं हे सिनेमागृह वैविध्यपूर्ण सोयी सुविधांनी सुसज्ज झालं आहे.

१९३५ मध्ये पारशी व्यापारी शियावक्स कावसजी कंबाटा यांच्या मालकीच्या जागेवर वास्तुविशारद सोहराबजी भेदवार यांनी डिझाईन केलेलं हे सिनेमागृह. या सिनेमागृहाचं इरॉस हे नाव ग्रीक देवतेच्या नावावरुन ठेवण्या आलं. १० फेब्रुवारी १९३८ या दिवशी हे सिनेमागृह प्रेक्षकांसाठी खुलं करण्यात आलं. ही इमारत कंबाटा कुटुंबाच्या मालकीची होती. त्यानंतर ही इमारत आता मेट्रो रिअॅलिटीला ३० वर्षे भाडे तत्त्वावर देण्यात आली. आता या ऐतिहासिक वास्तूची डागडुजी पूर्ण झाली आहे. पु्न्हा एकदा नव्या खास अनुभवासह आयकॉनिक समजल्या जाणाऱ्या या सिनेमागृहात प्रेक्षकांना सिनेमा पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे.

मेट्रो रिअॅलिटीची व्यवस्थापकीय भागीदार अक्षत गुप्ता यांनी सांगितलं की या सिनेमागृहात असलेली कलाकुसर अत्यंत नाजूक होती. त्यामुळेच डागडुचीसाठी आम्हाला वेळ लागला. इरॉसच्या अनेक आठवणी मुंबईकरांच्या आणि इथे भेट दिलेल्या प्रत्येकाच्या मनात आहेत. आम्हाला त्या तशाच जपून पुनर्रचना करायची होती. तसंच सिनेमा हॉलचा रेड कार्पेटचा इतिहास आणि स्थापत्य कला हे सांभाळून आम्ही ही रचना केली आहे. लिफ्टपासून पायऱ्यांपर्यंत अगदी प्रत्येक बारकाव्याचा विचार आम्ही केला आहे. इरॉसच्या मूळ प्रतिमेला धक्का न लावता हे काम करण्यात आलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button