राजकारण

पिंपरी चिंचवडमध्ये चालू आहे भाजप ‘राष्ट्रवादी’त श्रेयवादाची लढाई

पिंपरी : महापालिकेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजनाचे श्रेय घेण्यासाठी राज्यातील सत्तेत एकत्र असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरू असल्याचे दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी पिंपरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील केवळ आठ प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन करण्यात आले. उर्वरित ११ प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन भाजप पदाधिकाऱ्यांच्या आग्रहावरून दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी करण्याचे नियोजित असल्याचे सूत्रांनी सांगितले. आमदार महेश लांडगे यांच्या भोसरी मतदारसंघातील कामांचा त्यामध्ये समावेश असल्याचे सांगितले जाते.

भाजपने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता अजित पवार यांच्याकडून २०१७ मध्ये खेचून घेतली होती. शहरात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांचे विरोधक होते. पण, अजित पवार हेच शिवसेना-भाजप सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे शहर भाजपमध्ये अद्यापही नाराजी दिसून येत आहे. त्यांच्याशी जुळवून घेणे कठीण दिसत आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असताना झालेल्या कामांचे श्रेय अजित पवार घेत असल्याची भावना भाजपमध्ये आहे. त्यामुळेच सर्व प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन अजित पवार यांच्या एकट्याच्या हस्ते करण्यास भाजपचा विरोध दिसून आला.

प्रशासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे नियोजन केले. परंतु, तीन महिन्यांपासून प्रशासनाला तिघांची एकत्रित वेळ मिळाली नाही. नेत्यांसाठी उद्घाटने रखडल्याने महापालिकेच्या कारभारावर नागरिकांमधूनही नाराजी व्यक्त केली जात होती. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची एकत्र वेळ मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशासनाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी सात प्रकल्प आणि ऐनवेळी भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक या ४५ मीटर रस्त्यावरील रेल्वे लाईनवरील उड्डाणपूलाचे उद्घाटन उरकून घेतले. तर, उर्वरित विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे नियोजन प्रशासनाकडून सुरू झाले आहे.

सर्व प्रकल्प भोसरी विधानसभा मतदारसंघातील आहेत. लाइट हाऊस, जैववैद्यकीय घनकचरा विल्हेवाट प्रकल्प, कुदळवाडी-जाधववाडीत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, चऱ्होलीतील निवासी गाळे, चिखलीत टाऊन हॉल, हॉटेल कचऱ्यापासून जैविक वायुनिर्मिती या प्रकल्पांचे उद्घाटन, तर मोशीत गायरान जागेवर रुग्णालय उभारणे, मोशी कचरा डेपोतील कचऱ्याचे बायोमायनिंग टप्पा दोनचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रविवारी करण्याचे नियोजन असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यानंतर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा अजित पवार यांना तीव्र विरोध दिसून आला. महापालिका निवडणुकीवेळी ‘नको बारामती, नको भानामती’ असे फलक शहरात लावले होते. त्यातून पवार आणि लांडगे यांच्यातील वाढलेला राजकीय विरोध दिसून आला होता. भोसरी मतदारसंघातील कामांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेच व्हावे, असा आमदार लांडगे यांचा आग्रह असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आणि महापालिका प्रशासनात आहे. शुक्रवारी पवार यांच्यासोबत उद्घाटन कार्यक्रमाला येणेही लांडगे यांनी टाळले. त्यामुळे पवार भाजपसोबत सत्तेत आल्यानंतरही त्यांचे आणि लांडगे यांचे सूत जुळले नसल्याची चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button