रिक्षा चोरणार्या आरोपीला मध्यवर्ती गुन्हे शाखेने केली अटक; ९ रिक्षा, २ मोटर सायकल केल्या जप्त

वसई : मिरा भाईंदरसह मुंबई, ठाणे व वसई विरार परिसरातून रिक्षा चोरणार्या व नंतर त्या भाड्याने चालवायला देणार्या आरोपीला मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून चोरी केलेल्या ९ रिक्षा व दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. भाईंदर पश्चिम येथील राई पुला जवळून रिक्षा चोरी झाल्याची तक्रार भाईंदर पोलीस ठाण्यात दाखल झाली ओती. मिरा भाईंदर व वसई विरार भागात वाहन चोरीचे प्रमाण वाढत असल्याने या गुन्हयाचा समांतर तपास मध्यवती गुन्हे शाखाही करत होती.
एक इसम विरार पूर्व येथील रामु कम्पाऊन्ड, अंबा मंदीराच्या पाठीमागे चोरीच्या रिक्षा व दुचाकी आणून त्याचे भाग वेगळे करुन विकत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानंतर पोलीसांनी सापळा रचला असता अश्रफ ऊर्फ सलमान मंहमद परवेज शेख हा रिक्षेसोबत छेड छाड करीत असल्याचे दिसून आले. ताब्यात घेवुन आश्रफला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने भाईंदर येथून रिक्षा चोरी केल्याचे कबूल केले.
त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने ९ रिक्षा व २ दुचाकी साथीदाराच्या मदतीने चोरल्या असल्याचे पोलीसांना सांगितले. विशेष म्हणजे रिक्षा चोरी केल्यानंतर अश्रफ त्याचा क्रमांक बदलत असे व नंतर ती भाड्याने चालवायला देत असे अशी माहिती पोलीसांनी दिली. पोलीसांनी त्याच्याकडून ९ रिक्षा, २ मोटर सायकल व मोबाईल फोन असा एकूण ६,८८,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यामुळे मिरा-भाईंदर, वसई- विरार, मुंबई, ठाणे आदी ठिकाणी झालेले एकुण ११ चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.