राजकारण

विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय अपेक्षितच; सर्वोच्च न्यायालयात निश्चित न्याय मिळेल- सुप्रिया सुळे

पुणे : विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय हा आमच्यासाठी अपेक्षितच होता, आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असून न्यायालय याबाबत योग्य तो निर्णय घेईल, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. बारामतीत त्या माध्यमांशी बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस पक्षात विलीन होणार अशा बातम्या येत असल्याबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या की, तुम्हाला तुमच्या माध्यमांची विश्वासार्हता जपायची असेल तर खात्री करूनच अशा प्रकारच्या बातम्या द्या, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार यात कसलेही तथ्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.

विविध समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात राज्य शासन असंवेदनशील आहे, मी स्वतः अनेकदा संसदेत याबाबत आवाज उठवला आहे, मात्र राज्य शासनाकडून कोणत्याही प्रकारची ठोस कृती केली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. २ ०० आमदार व ३००  खासदार असलेल्या सरकारला आरक्षणाबाबत निर्णय घेणे अवघड नाही, असेही त्या म्हणाल्या.

मनोज जरांगे पाटील यांनी खूप सहनशीलता दाखवली आहे , त्यांनी अनेकदा सरकारचं म्हणणं ऐकून आंदोलन मागे घेतले पण सरकार याबाबत काहीही करायला तयार नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने सर्वांचीच फसवणूक केली आहे. ज्या काँग्रेसने अशोक चव्हाण यांना भरभरून दिलं त्यांनी आज वेगळा विचार केला आहे, भाजपला देखील नवीन नेतृत्वाची आता गरज भासू लागली असल्याची टीका त्यांनी केली.

पुढील पाच वर्ष जे नेते मेहनत करतील तेच नेते या राज्यातील जनतेच्या मनावर पुढील २५  वर्ष राज्य करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी खासदार म्हणून काम करत असल्यापासून गेल्या अठरा वर्षात कधीही माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही किंवा मी कधीही कोणतेही कॉन्ट्रॅक्ट घेतले नाही किंवा माझा नवरा देखील कधीही बारामतीत फार येत नाही. आम्ही कोणीही कसल्याही भानगडीत पडत नाही, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. जनतेचे प्रश्न सोडवणे हेच माझे समाजकारण व राजकारण आहे.

भाजपमध्ये काम करणारे मूळचे निष्ठावान नेते आज कोठे आहेत, असा सवाल करत सत्ता येऊनही त्यांना कुठे स्थान मिळत नाही ते कायमच विरोधातच दिसतात अशी टीका त्यांनी भाजपवर बोलताना केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button