आलिया भट्टची निर्मिती असलेल्या ‘पोचर’ मध्ये हत्तींच्या अवैध शिकारीचा होणार पर्दाफाश
एमी पुरस्कार विजेता निर्माता आणि दिग्दर्शक रिची मेहताच्या पोचर नावाच्या मालिकेचा ट्रेलर हा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेची चाहते वाट पाहत आहेत. त्याच्या ट्रेलर लॉचिंग सोहळा मुंबईत पार पडला. सोशल मीडियावरुन या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे.
पोचर ही मालिका सत्य घटनांवर आधारित असून त्याची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट ही या मालिकेची निर्माती असून तिनं देखील या मालिकेच्या निमित्तानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिनं म्हटले आहे की,रिचीची ही सीरिज खूपच महत्वाच्या मुद्दयांवर आधारित आहे. त्यातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळतील.
मला या सीरिजच्या निमित्तानं कळलं की, हत्तींना किती निघृणपणे मारण्यात आले आहे.त्यांची हत्या करण्यात आली आहे. वास्तविक घटनांवर आधारित ही मालिका प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे.असेही आलियानं म्हटले आहे. अॅमेझॉन प्राईमवर ही मालिका फेब्रुवारीच्या २३ तारखेला प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आलियानं या मालिकेच्या प्रमोशन व्हिडिओमध्ये सहभाग घेतला आहे. तिनं म्हटलं आहे की, या प्रोजेक्ट्सचा भाग होणं ही माझ्यासाठी खूपच गर्वाची बाब आहे. याचा मला आनंद आहे. ही सीरिज जंगलातील प्राण्यांच्या अवैध शिकारीवर सडेतोडपणे भाष्य करणारी आहे. त्या प्राण्यांची हत्या करुन आंतरराष्ट्रीय बाजारात सौदेबाजी करणं हे अद्यापही सुरु आहे. मला खात्री आहे की, या पोचरच्या माध्यमातून अवैध शिकार प्रकरणावर काही अंशी का होईना प्रकाशझोत टाकता येईल.
ट्रेलरच्या लॉचिंगच्यावेळी अभिनेत्री आलियानं व्यक्त केलेलं मनोगत हे चर्चेत आलं आहे. तिनं म्हटलं आहे की, मी जेव्हा पोचरच्या निमित्तानं रिची मेहताला भेटले होते तेव्हा मी गरोदर होते. मला तिनं सांगितलेल्या विषयाचे फारच कुतूहल होते. मला ती स्टोरी खूपच आवडली. आणि आम्ही त्यावर चर्चाही केली. मला ही सीरिज आणि त्याचा विषय फार वेगळ्या जगात घेऊन गेली. असं तिनं म्हटलं आहे.