पुणे ग्रामीण पोलीसांची कारवाई; चोरी करुन वृद्ध महिलेचा खून करणाऱ्या दाम्पत्याला अटक

पुणे : शेतमजुरीचे काम मिळवण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेसोबत जवळीक साधली. त्यानंतर चोरी करुन वृद्ध महिलेचा खून करुन फरार झालेल्या दाम्पत्याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अहमदनगर येथून अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.१२) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमरास जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी येथे घडली होती.
सुलोचना कोंडीभाऊ टेमगिरे (वय ७०, रा. मांजरवाडी, ता. जुन्नर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. शिवम ऊर्फ संकेत शाम श्रीमंत (वय २१), पुनम संकेत श्रीमंत (वय २०, दोघे रा. चिखली, ता. चिखली, जि. बुलढाणा) अशी अटक केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलोचना टेमगिरे यांचा मृतदेह धनवटमळा या ठिकाणी आढळून आला होता. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. तसेच घरातील कपाटातील कपडे अस्ताव्यस्त पडल्याचे आढळून आले होते. हा गुन्हा भरदिवसा ग्रामीण भागातील लोकवस्तीत घडल्याने गांभीर्य वाढले होते.
याबाबत नारायणागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाण्यातील पथक तयार करण्यात आले होते. या पथकांकडून घटनास्थळाकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत होते. याच दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपींची माहिती मिळाली. बुलढाणा जिल्ह्यातील एक दाम्पत्य खोडद परिसरात शेतमजुरी करण्यासाठी आले होते. हे दाम्पत्य आठ दिवसांपूर्वी अचनाक निघून गेले. मात्र, ज्या दिवशी खूनाची घटना घडली त्या दिवशी हे दाम्पत्य धनवटमळा परिसरात दिसल्याची माहिती मिळाली.
पोलिसांच्या पथकाने संशयित जोडप्याची माहिती मिळवली. पथक बुलढाणा जिल्ह्यात जात असताना संशयित पती-पत्नी अहमदनगर बस स्थानक परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मयत टेमगिरे यांच्या घरातून चोरलेला ऐवज जप्त केला असून दागिन्यांबाबत पोलीस आरोपींकडे चौकशी करीत आहेत.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, सहायक फौजदार अभिजीत सावंत, सनील धनवे, जगदेवाप्पा पाटील, विनोद धुर्वे, पोलीस अंमलदार दिपक साबळे, राजू मोमीण, अतुल डेरे, प्रकाश वाघमारे, विक्रम तापकीर, मंगेश थिगळे, अक्षय नवले, संदिप वारे, शैलेश वाघमारे, तुषार भोईटे, संतोष कोकणे, अमोल शेडगे, धिरज जाधव, सत्यम केळकर, निलेश शिंदे, अक्षय सुपे, दगडू विरकर, सचिन सातपुते, आदिनाथ लोखंडे, गोविंद केंद्रे, मंगेश लोखंडे, दत्ता ढेंबरे, महिला अंमलदार तनश्री घोडे यांनी केली आहे.