पुण्यातील नियंत्रण कक्षाला दूरध्वनी; वांद्रे आणि गेट वे जवळ होणार स्फोट
मुंबई : पुण्यातील शिवाजी नगर, पिंपरी-चिंचवड तसेच मुंबईतील वांद्रे व गेट वे ऑफ इंडिया येथे स्फोट होणार असल्याचा दूरध्वनी पुण्यातील मदत क्रमांक ११२ वर आला होता. त्यामुळे स्थानिक पोलिसांसह मुंबई पोलिसांच्या सर्वच यंत्रण सतर्क झाल्या. पण तपासणीअंती काहीच संशयास्पद आढळले नाही.
पुण्यातील मदत क्रमांक ११२ वर शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास एक दूरध्वनी आला होता. पुण्यातील शिवाजी नगर, पिंपरी चिंचवड तसेच मुंबईतील वांद्रे व गेट वे ऑफ इंडिया येथे सायंकाळी ५ च्या सुमारास ब्लास्ट होणार असल्याची माहिती दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने दिली. त्यानंतर पुणे पोलिसांनी तात्काळ मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर तात्काळ स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा व इतर यंत्रणांना याबाबतची माहिती देण्यात आली. पण तपासणीत काहीच संशयास्पद आढळले नाही.
या प्रकरणाशिवाय गेल्या वर्षभरात मुंबई पोलिसांना धमकी व खोटी माहिती देणारे किमान शंभरहून अधिक संदेश अथवा दूरध्वनी प्राप्त झाले आहेत. पोलिसांना सुरक्षा, बंदोबस्त, तपास कामासह अशा अफवांनाही नेहमी सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर अनेक मिसकॉलही येत असतात. ते नेमके कोणाकडून आले, हे पडताळण्यासाठी त्यांवर पुन्हा दूरध्वनी केल्यावरही अजब उत्तरे ऐकायला मिळतात. अनेक जण दूरध्वनी सुरू आहेत का, याची खात्री करण्यासाठी दूरध्वनी करतात. वैयक्तीक वाद, आर्थिक वाद, प्रेमप्रकरणे यातून एकमेकांना अडवकण्यासाठीही दूरध्वनी करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीनंतही पोलिसांना नियमित येणाऱ्या सर्व दूरध्वनींची पडताळणी करावी लागते. प्रश्न सुरक्षेचा असल्यामुळे त्याबाबतीत कोणताही धोका पत्करू शकत नाही. त्यामुळे तपासासोबत सुरक्षा यंत्रणांना अशा अफवांशीही दोन हात करावे लागतात. त्यामुळे या अफवा पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.