मराठमोळ्या पुष्पाला करायचय साऊथच्या सुपरस्टारसोबत काम
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘पुष्पा’ ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आणि बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. या चित्रपटानंतर चाहते याच्या सीक्वलची उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. अभिनेता श्रेयस तळपदे याने पुष्पा या सिनेमाच्या हिंदी डबिंगमध्ये मुख्य कलाकार अल्लू अर्जुन याला म्हणजेच पुष्पाला हिंदीत आवाज दिला आहे. हा आवाज आणि त्यातील डायलॉग खूप लोकप्रिय झाला. हिंदी सिनेमाप्रेमींनी तर श्रेयसच्या आवाजाची तोंडभरून स्तुती केली होती. त्यामुळे श्रेयसचे चाहते पुन्हा एकदा त्याचा पुष्पाच्या सीक्वेलमध्ये आवाज ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान आता श्रेयसने दिलेल्या मुलाखतीत या अनुभवाबद्दल सांगितले आणि अल्लूला भेटायचे राहून गेल्याचे सांगितले.
अल्लू अर्जुन यांना अजून पर्यंत भेटलो नाही. पण मला त्यांना भेटायला आवडेल. जेव्हा मी डबिंग करत होतो त्याआधी मी पुष्पा चित्रपट पाहिला मला खूप आवडला. डब करताना अजिबात ध्यानीमनी नव्हतं की आवाजाला इतका चांगला रिस्पॉन्स मिळेल. फक्त एवढंच होतं की अल्लू अर्जुन यांनी स्क्रीनवर जी मेहनत केली, त्याला माझ्या आवाजातून न्याय देण्याची जबाबदारी माझी होती. मी खूश आहे की ते लोकांपर्यंत तशा पद्धतीने पोहचले. मी त्याला न्याय देऊ शकलो. ते लोकांना खूप आवडले.