महाराष्ट्र

बारावीची परीक्षा आजपासून; गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळातर्फे व्यापक उपाययोजना

पुणे : राज्य मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आज, बुधवारपासून सुरू होत असून ती १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थी देणार आहेत. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रश्नपत्रिकेचे लिफाफे ताब्यात घेतल्यापासून प्रश्नपत्रिका वितरित करेपर्यंतचे चित्रीकरण करण्यात येणार असून वाहतुकीवेळी जीपीएस प्रणालीचा वापर केला जाणार आहे.

बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान होत आहे. यंदा विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक सात लाख ६० हजार ४६ विद्यार्थी, कला शाखेसाठी तीन लाख ८१ हजार ९८२, वाणिज्य शाखेसाठी तीन लाख २९ हजार ९०५, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ३७ हजार २२६, आयटीआयसाठी चार हजार ७५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, की परीक्षा सुरक्षित वातावरणात होण्यासाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली. यंदा पहिल्यांदाच प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ऑनलाइन पद्धतीने भरून घेतले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून १० समुदेशकांची, तर विभागीय मंडळांमध्ये जिल्हानिहाय दोन याप्रमाणे समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुल्क भरले नाही किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र देण्यास टाळाटाळ करू नये, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, प्रवेशपत्र देण्यास टाळाटाळ केल्याच्या दोन तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाई केली जाणार आहे, असेही गोसावी यांनी सांगितले.

यंदा राज्य मंडळाने अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण ऑनलाइन प्रणालीद्वारे नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रचलित पद्धतीच्या तुलनेत ऑनलाइन प्रणालीमुळे काम अधिक वेगाने होणार आहे. त्याचा परिणाम निकाल तयार करण्याच्या प्रक्रियेवरही होऊ शकतो. त्यामुळे मे अखेरीपर्यंत बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर १० मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रात साडेदहा वाजता, दुपारच्या सत्रात अडीच वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायचे आहे. परीक्षेची वेळ सुरू झाल्यावर प्रवेश दिला जाणार नाही, असे गोसावी यांनी सांगितले.

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या वारंवार आंदोलन करूनही मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंदळकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button