‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘मैदान’ दोन्ही चित्रपट होणार ११ एप्रिलला प्रदर्शित

मुंबई : एप्रिल महिन्यात ईद आणि मुलांना लागणाऱ्या सुट्ट्या लक्षात घेऊन अक्षय कुमार – टायगर श्रॉफ जोडीचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘मैदान’ हे दोन मोठे चित्रपट बुधवार, १० एप्रिलजी प्रदर्शित होणार होते. मात्र आता या दोन्ही चित्रपटांचे प्रदर्शन एका दिवस पुढे ढकलण्यात आले असून ते गुरूवार, ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहेत.
फेब्रुवारी आणि मार्च या परीक्षा काळात कोणतेही मोठे हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले नव्हते. ह्रतिक रोशन – दीपिका पदुकोण जोडीचा ‘फायटर’ २५ जानेवारीला प्रदर्शित झाला होता. त्यानंतर फेब्रुवारीत शाहीद कपूर – क्रिती सनन जोडीचा ‘तेरी बातों मे ऐसा उलझा जिया’ आणि मार्च अखेरीस प्रदर्शित झालेला ‘क्रू’, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हे दोन चित्रपट वगळता हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांनी आपले मोठे चित्रपट प्रदर्शित केले नव्हते. ईदच्या मुहूर्तावर अक्षय कुमार – टायगर श्रॉफ जोडीचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि अजय देवगणचा ‘मैदान’ असे दोन मोठे चित्रपट आमनेसामने येणार आहेत. हे दोन्ही चित्रपट १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता ईद ११ एप्रिल रोजी साजरी होत असल्याने या दोन्ही चित्रपटांचे प्रदर्शन एका दिवसाने पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या दोन्ही चित्रपटांची आगाऊ तिकीट विक्री करण्यात आली आहे. ‘मैदान’ चित्रपटाचे काही शोज ईदच्या पूर्वसंध्येला निवडक ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाचे शो ११ एप्रिलला सकाळपासून सुरू आहेत. या चित्रपटाची लांबी सात ते आठ मिनिटांनी कमी करण्यात आली असल्याचेही सांगितले जाते. या दोन्ही चित्रपटांची देशभरात आगाऊ तिकीट विक्री सुरू झाली आहे. आत्तापर्यंत ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाची नऊ हजार तिकीटांची विक्री झाली आहे, तर ‘मैदान’ चित्रपटाची सहा हजार तिकीटांची विक्री झाली आहे. हे दोन्ही मोठे चित्रपट किती कमाई करतात याकडे चित्रपट व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.