गुन्हे

मुंबईत घरफोडी करणारा आसामचा ‘हाय फ्लाईंग’ चोर अडकला पोलिसांच्या जाळ्यात

ठाणे : आतापर्यंत ट्रेन बस आणि दुचाकीवरून येणारे अट्टल चोर आपण सर्वांनी पाहिलं असेल, परंतु घरफोड्या करण्यासाठी चक्क विमानाने प्रवास करणारा अट्टल चोराबद्दल कधी ऐकलंय का? पण असा एक चोर गजाआड झाला आहे. मोईनुद्दीन अब्दुल मलिक इस्लाम असं त्याचं नाव असून हा अट्टल दरोडेखोर थेट आसाम वरून मुंबईत येऊन घरफोड्या करून परत विमानाने जात असे. अशा या ‘हाय फ्लाईंग’ चोरट्याला अखेर ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आतापर्यंत घरफोड्या झाल्या की पोलीस बस स्थानक, रेल्वे स्थानक येथे सापळा रचून गुन्हेगारांना पकडण्याचा प्रयत्न करत असत. परंतु आता या हाय फ्लाईंग गुन्हेगाराने पोलिसांच्या तपासाची दिशा बदलली आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून येथे पैशाला तोटा नाही आणि त्यामुळेच सर्वजण मुंबई या महानगरीकडे आकर्षित होतात. त्यात अनेक अट्टल गुन्हेगार देखील सामील झालेले आपण पाहतो.

मोईनुद्दीन अब्दुल मलिक इस्लाम हा आसामचा राहणार अट्टल गुन्हेगार देखील त्यातीलच एक. गुवाहाटीहून थेट मुंबईला तो विमानाने प्रवास करत असे आणि घरफोडी करून परत गुवाहाटीला विमानानेच परत जात असे. अशीच एक नारपोली पोलीस स्थानकाच्या हद्दीत घरफोडी करून तो आसामला परतला, पण पोलीस त्याच्या मागावर होते. त्याचा तपास करणे पोलिसांना अत्यंत कठीण गेले. कारण तो मोबाईल स्विच ऑफ करून फिरत होता.  पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करत थेट गुवाहाटी गाठली आणि आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना पाहताच त्याने पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली असता त्याच्या पायाला इजा देखील झाली. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात उभे केल्यावर ट्रान्सफर वॉरंट मिळवलं.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या युनिट १ चे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे, नारपोली पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड आणि एपीआय केदारी यांनी त्याला अटक करून ठाण्यात आणले. आरोपीने केलेल्या २२ घरफोड्यांमधून एकूण ६२ लाख रुपयांचे ८९ तोळे सोने चोरले होते ते पोलिसांनी जप्त केले आहे. ठाणे पोलीस आयुक्तातील नारपोली, विष्णूनग,र वागळे इस्टेट, खडकपाडा, वर्तकनगर अशा भागांमधून त्याने घरफोड्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. २०२२ साली देखील त्याला नवी मुंबई येथे अटक झाली होती. त्यावेळी त्याने सात घरफोड्या केल्याचे मान्य केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button