एलोरा, युनिकॉर्न पब प्रकरणी आयुक्त आक्रमक; संबंधित कर्मचारी,अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश
पुणे : पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, नाइट राऊंड अधिकारी यांना कल्याणीनगर येथील एलोरा आणि युनिकॉर्न हे पब रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे कसे निदर्शनास आले नाही? स्थानिक नागरिकांना याबाबत माहिती मिळते, मग त्यांना का मिळत नाही? आम्ही सुरुवातीपासूनच स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत. हॉटेल, पब चालकांना नियमात काम करावे लागेल. असे असतानाही जर स्थानिक पोलिस ठाण्याचे लोक त्यांच्यावर मेहेरबानी दाखवत असतील, तर त्यांची गय केली जाणार नसल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले आहे. त्यामुळे एलोरा आणि युनिकॉर्न पब प्रकरणी येरवडा पोलीस अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी, संबंधित अधिकारी, कर्मचार्यांची चौकशीचे आदेश अमितेश कुमार यांनी दिले आहेत. पोलिस आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधला त्या वेळी ते बोलत होते.
अमितेश कुमार म्हणाले, की हा प्रकार आम्ही गांभीर्याने घेतला आहे. तयार करण्यात आलेल्या नियमावलींचे उल्लंघन करून काही हॉटेल, पबवाले पहाटेपर्यंत धांगडधिंगा सुरू ठेवत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्यानंतर देखील स्थानिक पोलिस ठाणे त्यांच्यावर मेहेरबानी दाखवत असल्याचे दिसते. नागरिक आमच्याकडे तक्रारी करतात. त्यांच्या निदर्शनास असे प्रकार येतात, मग स्थानिक पोलिसांना हे का दिसत नाही? त्यामुळे आता त्यांची जबाबदारी ठरवावी लागेल, असे म्हणत पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. यापुढे आदेशानंतर देखील पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याचे निदर्शनास आले, हॉटेल पब पहाटेपर्यंत डिजेच्या तालावर मद्यधुंद रात्र जागविताना दिसून आले, तर त्याची धग पोलिस ठाण्याच्या प्रभारींना देखील बसणार हे मात्र नक्की आहे.
शहरातील हॉटेल्स, पबसंदर्भात पोलिस आयुक्तांनी नियमावली तयार केली आहे. रात्री दीड वाजेपर्यंत त्यांना परवानगी देण्यात आली असून, याबाबत १४४ चे आदेश देखील लागू करण्यात आले. मात्र, पबवाल्यांनी चक्क पोलीस आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत रात्री दीडनंतरही आपला धांगडधिंगा सुरू ठेवल्याचे येरवडा कल्याणीनगर येथील एलोरा, युनिकॉर्नप्रकरणी समोर आले आहे. दरम्यान, या दोन्ही पबसंदर्भात नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर स्वतः पोलिस आयुक्तांनी आदेश देत सोमवारी रात्री एलोरा आणि युनिकॉर्न या दोन्ही पबवर कारवाई केली. दोन ठिकाणी आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आयुक्तांनी घेतलेल्या या ठोस भूमिकेने अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली असून, यापुढे तरी आदेशाचे काटेकोर पालन होईल, अशी अपेक्षा आहे..