वृत्तसंस्था : गेल्या काही दिवसांपासून संरक्षण मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते राजनाथ सिंह शेजारी राष्ट्रे अर्थात पाकिस्तान आणि चीनबाबत फारच आक्रमक झालेले दिसत आहेत. त्यानंतर आता पाकिस्तानातील दहशतवाद संपवण्यासाठी त्यांना मदत करण्याचा प्रस्तावही त्यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत मांडला आहे. जर पाकिस्तानला दहशतवाद नियंत्रणात आणता येत नसेल तर त्यांना मदत करण्याची आमची तयारी आहे असे राजनाथ यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानकडून आपली एवढीच अपेक्षा आहे की जर दहशतवादाची मदत घेत भारतातील वातावरण बिघडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. त्यांना दहशतवाद आटोक्यात आणता येत नसेल तर त्यांनी शेजारी राष्ट्रांची मदत घ्यावी. आमची त्यांना मदत करण्याची तयारी आहे असे राजनाथ या मुलाखतीत म्हणाले.
चीनच्या संदर्भात बोलताना त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या विधानांचा संदर्भ दिला. वाजपेयी म्हणायचे तुम्ही मित्र बदलू शकतात, शेजारी नाही. भारताने आपली एक इंच भूमीही चीनला बळकावू दिली नाही आणि नरेंद्र मोदी यांचे सरकार असेपर्यंत तसे होणारही नाही. पाकव्याप्त काश्मीरबाबतही त्यांनी टिप्पणी केली व ते म्हणजे पीओके आमचे होते, आमचे आहे आणि आमचे राहील अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली.