तिकीट नाकारल्यानंतर विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा भाजपात प्रवेश
पालघर : शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना पालघर लोकसभेतून उमेदवारी नाकारण्यात आली. ज्यामुळे नाराज झालेल्या गावितांनी घरवापसी करण्याचा निर्णय घेत भाजपात प्रवेश केला आहे. मंगळवारी (ता. ०७ मे) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्ष प्रवेश केला. यावेळी खासदार राजेंद्र गावित यांना हा प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संमतीनेच केला असल्याचे म्हटले आहे. तर मुख्यमंत्र्यांनी संमती दिल्यामुळेत गावितांना पक्षात घेण्यात आले, असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. पण यावरून आता शिंदे गटाच्या नेत्याकडूनच भाजपावर आरोप करण्यात आला आहे.
शिवसेनेच्या तिकीटावर पालघर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या राजेंद्र गावित यांनी सत्तांतरानंतर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीत पालघरच्या जागेवरून शिंदे गट आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरू होती. उमेदवारी देईल त्यापक्षातून लढण्याची गावित यांची तयारी होती. पालघरची जागा भाजपाच्या वाट्याला आल्यानंतर भाजपाची उमेदवारी मिळेल, अशी गावितांची अपेक्षा होती. पण, भाजपामधूनच गावितांना मोठा विरोध झाल्याने भाजपाने डॉ. हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली. त्यामुळे गावित नाराज झाले होते. तशी उघड नाराजी त्यांनी बोलूनही दाखवली होती. मात्र, मंगळवारी अचानक गावितांनी मुंबईत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थिती भाजपमध्ये प्रवेश केला.
खासदार राजेंद्र गावित यांचा भाजपा प्रवेश हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संमतीने झालेला आहे, असे सांगण्यात येत असले तरी भाजपाकडून शिवसेना फोडण्याचा कट रचला जात आहे, असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते केंदार काळे यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४५ पेक्षा जास्त जागा महायुतीच्या महाराष्ट्रात येण्यासाठी शिवसैनिकांना आदेश दिले आहेत. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक झटत आहे. अशावेळेस शिवसेनेच्या खासदारांना भाजपाने प्रवेश दिला हे शिवसैनिकांच्या पचनी पडणारे नसून शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. युतीचा धर्म दोन्हीकडून पाळला जावा अशी शिवसेनेची मागणी आहे. राजेंद्र गावित निवडून येणार नाहीत, म्हणून भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना विरोध केला होता, असेही यावेळी काळे यांच्याकडून सांगण्यात आले.
२०१८ मध्ये पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राजेंद्र गावित भाजपामध्ये आले होते. त्यानंतर त्यांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत ते विजयी झाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पालघरची जागा शिवसेनेला गेली होती. तेव्हा तत्कालीन खासदार राजेंद्र गावितांसह जागा द्या, असा आग्रह शिवसेना नेत्यांनी केल्याने गावित शिवसेनेत गेले होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संमतीनेच गावित पुन्हा भाजपामध्ये सामिल झाल्याचा दावा फडणवीस यांनी गावितांच्या पक्ष प्रवेशावेळी केला आहे.