शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पवारांच्या विधानाने ऐन निवडणुकीत चर्चेला उधाण

पुणे : राजकीय पक्षांच्या एका मोठ्या वर्गाला भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी पसंत नाहीत. आणि देशातील हे सर्व विरोधक एकत्र येऊ लागले आहेत. देशाचा मूड हा मोदीविरोधी आहे. आम्ही सर्व गांधी-नेहरू विचारांना घेऊन एकत्र सकारात्मक वाटचाल करत आहोत. पुढील दोन वर्षांमध्ये अनेक छोटे राजकीय पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन झालेले असतील असे विधान शरद पवारांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. आगामी दोन वर्षांमध्ये देशातील अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील असे भाकित शरद पवारांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीसोबत राज्यात निवडणूक लढवत आहे. त्यासोबतच देशातील अनेक छोटे पक्ष हे इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत. त्यामुळे पवारांच्या या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. ते म्हणाले की, पुढील दोन वर्षांमध्ये अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत जातील किंवा थेट काँग्रेसमध्ये विलीन होतील. हाच त्यांच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे असे वाटते. जेव्हा त्यांना थेट विचारण्यात आले की तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन होणार का? त्यावर पवारांनी काँग्रेस आणि आमच्या विचारसरणीत फार काही अंतर दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरू विचारांसोबतच आहे. मात्र पक्षाच्या विलीनीकरणाचा निर्णय याविषयी मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही तर पक्षातील सहकाऱ्यांचा सल्ला घेतल्याशिवाय त्यावर आता काही बोलता येणार नाही, अशीही पुष्टी त्यांनी जोडली.
काँग्रेससोबत राज्यातील दोन पक्ष आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेनाही सध्या काँग्रेससोबतच्या आघाडीत आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात शरद पवार म्हणाले की उद्धव ठाकरेंसोबत आम्ही काम करत आहोत. त्यांची विचारसरणी देखील आमच्यासारखीच आहे. समविचारी पक्षांसोबत काम करण्यासाठी ठाकरे सकारात्मक आहेत.