देशविदेशभारत

रामोजी फिल्मसिटीचे संस्थापक रामोजी राव काळाच्या पडद्याआड

ईनाडू वृत्तपत्र आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं आज पहाटे निधन झालं. हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पहाटे ३.४५ ला त्यांची प्राणज्योत मालवली. रामोजी राव यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यांना हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात ५ जून रोजी दाखल करण्यात आलं होतं. आज ते काळाच्या पडद्याआड गेले आहेत. ANI ने हे वृत्त दिलं आहे.

१६ नोव्हेंबर १९३६ या दिवशी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पेडापरुपुडी गावातल्या एका शेतकरी कुटुंबात रामोजी राव यांचा जन्म झाला. रामोजी राव यांनी रामोजी फिल्म सिटी या जगातील सर्वात मोठ्या थीम पार्क आणि फिल्म स्टुडिओची स्थापना केली. मार्गदर्शी चिट फंड, ईनाडू न्यूजपेपर, ईटीव्ही नेटवर्क, रमादेवी पब्लिक स्कूल, प्रिया फूड्स, कालांजली, उषाकिरण मूव्हीज, मयुरी फिल्म डिस्ट्रिब्युटर्स आणि डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स या रामोजी राव यांच्या मालकीच्या कंपन्या आहेत. रामोजी राव यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जातो आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी रामोजी राव यांचं निधन झालं आहे. त्यांचं पार्थिव हे रामोजी फिल्म सिटी येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे. त्या ठिकाणी ते अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात येईल. रामोजी राव यांच्या निधनानंतर हळहळ आणि शोक व्यक्त होतो आहे.

रामोजी राव यांच्या निधनानंतर नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की रामोजी राव यांच्याशी चर्चा करण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या निधनाचं वृत्त क्लेशदायक आहे. त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, सहवेदना या आशयाची पोस्ट नरेंद्र मोदींनी केली आहे.

रामोजी राव यांना पद्मविभूषण सन्मानित करण्यात आलं होतं. हैदराबादच्या रामोजी ग्रुपची स्थापना केली होती. रामोजी राव पत्नीचे नाव रमा देवी असून त्यांना दोन मुले होती. राव यांचा मुलगा चेरुकुरी सुमनचा २०१२ मध्ये रक्ताच्या कर्करोगाने मृत्यू झाला. किरण प्रभाकर असं त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव आहे. रामोजी राव यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button