महाराष्ट्र

पिंपरी-चिंचवड ‘दादा’ समर्थकांच्या जागेतील हॉटेलवर PMRDA ने चालवला बुलडोझर

पुणे : पिंपरी-चिंचवड आयटी पार्क हिंजवडी भागातील १० रेस्टो बार अँड रूफटॉप हॉटेलवर बुलडोझर फिरवण्यात आला. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए – PMRDA) अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई केली. मात्र, लोकसभा निकालाच्या एक दिवसानंतर झालेल्या या कारवाईत पाडण्यात आलेली ही सर्व हॉटेल अजितदादांच्या समर्थकांच्या जागेत असल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

राजकीय सुडापोटी आपल्यावर कारवाई करण्यात आल्याचे दादांच्या समर्थकांचा आरोप आहे. कारण या दहा हॉटेल व्यतिरिक्त अन्य अशाच प्रकारच्या काही हॉटेलना अभय दिले गेले आहे. हिंजवडी आयटी पार्क आणि आसपासचा परिसर हा भोर विधानसभा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची कन्या विद्यमान खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांच्यात लढत झाली. या लढतीकडे देशाचे लक्ष लागले होते. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील ही प्रतिष्ठेची लढत मानली जात होती.

प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात अजित पवार यांनी सुप्रिया सुळे समर्थकांना आपल्याकडे खेचले. मुळशी तालुक्यातील मोठी धेंड समजली जाणारी बहुतांश मंडळी दादांच्या गोटात सहभागी झाली. यातील काही मंडळी दादांची वक्रदृष्टी आपल्यावर पडायला नको, यासाठी घाबरून गेल्याची चर्चा होती. दादांच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे सुनेत्रा पवार यांचा विजय होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता.

दरम्यान, निकालानंतर दादांचा करिश्मा चालला नसल्याचे दिसून आले. लाखो मतांच्या फरकाने सुप्रिया सुळे विजयी झाल्या. त्यानंतर हिंजवडीसह तालुक्यात जल्लोष करण्यात आला. एकीकडे जल्लोष सुरू असताना दादांच्या समर्थकांची पळापळ सुरू झाली. मंगळवारी (दि. ४) मतमोजणी पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशीच सकाळपासून सात वाजल्यापासून हिंजवडीत पीएमआरडीएने कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये १० बार अँड रेस्टो आणि रूफ टॉप जमीनदोस्त करण्यात आले. मात्र, राजकीय सुडापोटी ही कारवाई करण्यात आल्याचे दादा समर्थकांनी आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. कारवाई करण्यात आलेले ८ हॉटेल्सचे मालक हे सुप्रिया सुळे यांचे समर्थक होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी ते अजित दादा गटात सहभागी झाले होते. इतर दोन हॉटलदेखील दादा गटाचे पदाधिकारी असणाऱ्या पार्टनरचे असल्याने कारवाई केल्याचा आरोप होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button