महाराष्ट्र

महापालिकेच्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांसह सुरक्षा अधिकाऱ्यांना पावसाळी आजारांबाबत प्रशिक्षण

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हिवताप, डेंग्यू आणि जलजन्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी यंदा वैद्याकीय महाविद्यालयातील डॉक्टर, खासगी डॉक्टर, आयुष डॉक्टर, आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि बांधकामाच्या ठिकाणी असलेले सुरक्षा अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यावर भर दिला आहे. आजवर २,४३२ डॉक्टर आणि २, ६७० सुरक्षा अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आणखी पाच हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल.

हिवताप नियंत्रणविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे, हिवताप रुग्णांवर समूळ उपचार करणे, तसेच डेंग्यू आणि जलजन्य आजारांवर प्रतिबंधात्मक नियंत्रण व उपाययोना करण्यासाठी केईएम रुग्णालयात १८ तुकड्यांमध्ये प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात वैद्याकीय रुग्णालये, सर्वसाधारण रुग्णालये आणि दवाखान्यांमधील एकूण ४८२ वैद्याकीय अधिकारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे डॉक्टर, खासगी डॉक्टर आणि आयुष डॉक्टर यांच्यासाठी जूनमध्ये प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत १,९५० डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तिन्ही विभागांमध्ये आयोजित करण्यात आले होते. खासगी वैद्याकीय संस्थांत प्रशिक्षण देऊन अधिकाधिक मनुष्यबळ उपलब्ध करण्यावर भर असेल. पालिका आरोग्य केंद्रातील पाच हजार कर्मचाऱ्यांसाठी जूनमध्ये प्रशिक्षण दिले जाईल.

वस्तीपातळीवर सर्वेक्षण, कीटकनियंत्रण करण्यासह झोपडपट्टी, गृहनिर्माण संस्था व चाळींत जनजागृती करण्यासाठी अतिरिक्त पालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी वैद्याकीय महाविद्यालयातील पीएसएम विभागाला सहाकार्य करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार त्या विभागाचे विभागप्रमुख व त्यांचे पथक विभागनिहाय भेटी देऊन हिवताप, डेंग्यू नियंत्रण कार्य करण्यात येत आहे.

निर्माणाधीन इमारतींच्या जागी तयार होणारी डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यात येतील. यासाठी २,६७० सुरक्षा अधिकारी व सहकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच, कीटकनाशक विभागाने चार वेळा विभागनिहाय ‘एडिस’ डास सर्वेक्षण करून ४४ हजार १२८ ठिकाणी डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button