महाराष्ट्र

जाहिरात फलकाची पाहणी करून कारवाईसाठी मुंबई महापालिका परवाना विभागाकडून पथके स्थापन

मुंबई : संपूर्ण मुंबईतील जाहिरात फलकाची पाहणी करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या परवाना विभागाने पथके स्थापन केली आहेत. जाहिरात फलकांचा आकार नियमानुसार आहे का, डिजिटल फलक रात्री ११ वाजल्यानंतर बंद होतात का याची पाहणी करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश या पथकाला देण्यात आले आहेत. तसेच चुकीची माहिती अहवालात दिल्यास पथकावरच कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

घाटकोपरमधील छेडानगर येथे जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेला एक महिना पूर्ण झाला आहे. या दुर्घटनेनंतर मुंबईतील अनधिकृत जाहिरात फलक, त्यांचा महाकाय आकार आणि त्यातील एकूणच अनियमितता आदी प्रश्न ऐरणीवर आले. त्यामुळे गेल्या महिन्याभरात पालिका प्रशासनाने जाहिरात फलकांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. तसेच अनधिकृत फलकांची माहितीही गोळा केली. मात्र आता ही माहिती तपासून पाहण्यासाठी पालिकेच्या परवाना विभागाने पथके तयार केली आहेत.

अप्पर मुख्य सचिवांच्या (गृह) दालनात १२ जून रोजी झालेल्या बैठकीतील निर्देशानुसार पालिकेचे उपायुक्त (विशेष) किरण दिघावकर यांनी याबाबत परिपत्रक जारी केले आहे. या कामासाठी शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरासाठी तीन पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यात परवाना विभागाचे निरीक्षक आणि विभाग कार्यालयांतील वरिष्ठ परवाना निरीक्षक यांचा समावेश आहे. जाहिरात मार्गदर्शक तत्त्वे २००८ नुसार डिजिटल फलक हे रात्री ११ नंतर बंद करणे अनिवार्य आहे. मात्र अनेक ठिकाणी जाहिरातदार या नियमाचा भंग करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पालिकेने हे पाऊल उचलले आहे.

या पथकांनी रात्री आपापल्या कार्यक्षेत्रात फिरून जाहिरात फलकांचा आकार नियमानुसार आहे का, त्यावर क्यूआर कोड आहे का, तसेच डिजिटल जाहिरात फलक रात्री बंद होते का याची माहिती घ्यायची आहे. तसेच सात दिवसात अहवाल सादर करायचा आहे. या अहवालात चुकीची माहिती दिल्यास संपूर्ण पथकावरच कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

डिजिटल जाहिरात फलक रात्री ११ नंतरही प्रकाशित असतात का यावर लक्ष ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाने मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांची मदत घेण्याचे ठरवले आहे. त्याकरीता दोन्ही विभागांना पालिकेच्या परवाना विभागाने पत्रही पाठवले आहे. रात्री ११ नंतर कुठे जाहिरात फलक प्रकाशित असल्याचे दिसल्यास त्याची माहिती पालिकेच्या विभाग कार्यालयाला दिल्यास त्या जाहिरातदारावर कारवाई करणे शक्य होईल, असे या पत्रात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button