बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या ७ बोटींवर मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई
वसई : राज्य शासनाने मासेमारी बंदी जाहीर केलेली असतानाही रेवस, उरण,करंजा आदी समुद्रात बेकायदा मासेमारी सुरू आहे. अखेर यावर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई करण्यास सुरवात केली आहे. नुकताच करंजा येथील ७ बोटींवर कारवाई करून त्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
समुद्रातील मत्स्य प्रजातींची वाढ होणे, त्याची निर्मिती होणे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे. याच हेतूने मत्स्य व्यवसाय विभागाने सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्याच्या कालावधी मध्ये राज्याच्या जलधी क्षेत्रात मासेमारी नौकांना पावसाळ्यात मासेमारी करण्यास बंदी घातली आहे. असे असतानाही मुंबई उपनगरात रेवस, उरण व करंजा ह्या बंदरातून पूर्ण पावसाळाभर मासेमारी होत आहेत. पर्ससीन तसेच एलईडीद्वारे देखील बेकायदा मासेमारी सुरू आहे. या बोटी सर्वत्र संचार करत आहेत. या बेकायदेशीर होणाऱ्या मासेमारीचा परिणाम अन्य ठिकाणच्या मच्छिमार बांधवांवर होण्याची शक्यता आहे. याशिवाय समुद्रात मत्स्यदुष्काळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
या बेकायदेशीर सुरू असलेल्या मासेमारी बाबत वारंवार तक्रार करूनही मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत होते. याबाबत पालघर मधील मच्छीमार संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. अखेर मत्स्यव्यवसाय विभागाने बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या बोटींवर कारवाई सुरू केली आहे.
करंजा येथील समुद्रात १३ ते १४ बोटी बेकायदेशीर मासेमारी करताना आढळून आल्या आहेत. त्यातील ७ बोटींवर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय बोटीतील जाळी, मासळी, साहित्य याचे मोजमाप करून त्या ताब्यात घेण्यात आले असल्याचे मत्स्य विभागाच्या अधिकारी प्रियंका भोये यांनी सांगितले आहे. उर्वरित बोटींवरही कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
बंदी काळातही काही बोटी छुप्या मार्गाने मासेमारी करीत असतात. बेकायदेशीर मासेमारीला आळा घालण्यासाठी पथके नेमली असून त्यांच्या मार्फत जेट्टी परिसर व समुद्राच्या भागात गस्त घातली जात आहे. बेकायदेशीर मासेमारी करताना कोणी आढळून आल्यास त्यावर कारवाई केली जात आहे. असे करंजा मत्स्य विभागाच्या अधिकारी प्रियंका भोये यांनी सांगितले आहे.
मागील वर्षी समुद्रात निर्माण झालेल्या मत्स्यदुष्काळाचा मोठा फटका पालघर जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांना बसला होता. केवळ २० ते २५ टक्के इतकेच मत्स्य उत्पादन झाले होते. तर काही मच्छिमारांनी ४० दिवसांची स्वघोषित मासेमारी बंद सुद्धा ठेवली होती. आता बंदीच्या काळातही जर बेकायदेशीर मासेमारी सुरू ठेवली जात असेल तर येणारा हंगाम ही दुष्काळाचा जाईल अशी चिंता मच्छीमारांना सतावत आहे.