जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत भारताची आंतरराष्ट्रीयमास्टर दिव्या देशमुख विजेती

भारताची आंतरराष्ट्रीयमास्टर दिव्या देशमुखने गुरुवारी कनिष्ठ गटाच्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत मुलींच्या गटात विजेतेपद मिळवले. दिव्याने अखेरच्या फेरीत बल्गेरियाच्या बेलोस्लाव क्रास्तेवाचा पराभव केला.
अखेरच्या फेरीतील विजयासह ‘लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार’ विजेती दिव्याने ११ फेऱ्यांच्या स्पर्धेत १० गुणांसह निर्विवाद वर्चस्वासह विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अर्मेनियाची मरियम मकरतच्यान दुसऱ्या स्थानावर राहिली. दिव्याने मरियमला अवघ्या अर्ध्या गुणाने मागे टाकले. अखेरच्या फेरीत मरियमने एकतर्फी लढतीत भारताच्या रक्षिता रवीचा पराभव करून तिच्या पदकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. अझरबैजानच्या अयान अल्लाहवेरदियेवाने रशियाच्या नॉर्मन सेनियाचा पराभव करुन ८.५ गुणांसह कांस्यपदक पटकावले.
स्पर्धेत नागपूरच्या १८ वर्षीय दिव्याने आपली छाप पाडली. दिव्याने क्वीन पॉन पद्धतीने सुरुवात करताना डावाच्या मध्यात बेलोस्लावविरुद्ध आपली बाजू भक्कम ठेवली होती. अचूक चाली करत दिव्याने बेलोस्लाववरील दडपण वाढवत डावावरील पकड घट्ट केली. ही पकड दिव्याने अखेरपर्यंत निसटू दिली नाही आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. ‘‘विजेतेपदाच्या प्रवासात अयान अल्लाहवेरदियेवावर मिळवलेला विजय सर्वात महत्त्वाचा ठरला,’’ असे दिव्याने सांगितले.
खुल्या गटात कझाकस्तानच्या नोगेरबेक काजिबेकने अखेरच्या फेरीपर्यंत आघाडीवर असलेल्या अर्मेनियाच्या मामिकोन घारबयानचा पराभव करून विजेतेपद मिळवले. टायब्रेकमध्ये सर्वोत्तम सरासरीवर नोगेरबेकने अर्मेनियाच्या एमिन ओहानयनला मागे टाकले. नोगेरबेक आणि एमिन दोघांचेही ८.५ गुण झाले होते. टायब्रेकमध्ये सरासरी गुणांच्या आधारावर नोगेरबेकला विजयी घोषित करण्यात आले. सर्बियाचा लुका बुदिसावलजेविच ८ गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिला. हा निर्णयही टायब्रेकरच्या सरासरी गुणांवर निश्चित झाला. त्याने जर्मनीच्या टोबियास कोलला मागे टाकले.
खुल्या गटात भारताचा ग्रँडमास्टर प्रणव आनंद ७.५ गुणांसह दहाव्या स्थानावर राहिला. अखेरच्या फेरीत त्याने अर्मेनियाच्या आर्सेन दावत्यानचा पराभव केला. आदित्य सावंत ११, तर अनुज श्रीवास्तव १२व्या स्थानावर राहिला. दिव्याची ‘लाइव्ह रेटिंग’ २४६४ असून या कामगिरीनंतर तो जगातील आघाडीच्या २० महिला बुद्धिबळपटूंमध्ये सहभागी झाली आहे.
अल्लाहवेरदियेवाविरुद्ध मी चांगल्या स्थितीत नव्हते. पण, जिद्दीने खेळ करून विजय मिळवला. ती लढत जिंकली नसती, तर कदाचित मी आज विश्वविजेती ठरली नसते.- दिव्या देशमुख