महाराष्ट्र

गुंड गजा मारणेकडून सत्कार स्वीकारला; नगरचे नवीन खासदार निलेश लंके वादात अडकणार

पुणे : शहरातील कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेणे अन् त्याच्याकडून सत्कार स्वीकरण्याचा प्रकार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके यांच्या चांगलाच अंगलट आला. त्या प्रकारानंतर अडचणीत आलेल्या खासदार निलेश लंके यांनी गुंड गजा मारणे कोण होता, हे माहितीच नव्हते असा आव आणत हात वरती केले. कळत न कळत माझ्याकडून चूक झाली, अशी भूमिका त्यांनी घेतली.  गुंड गजानन मारणे याने नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा सत्कार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने निलेश लंके यांच्यावर टीकेचा भडिमार केला. त्याला निलेश लंके यांनी उत्तर दिले.

मी दिल्लीवरुन आलो. माझे पवार नावाचे सहकारी होते. त्यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या नातेवाईकांची भेट झाल्यानंतर आम्ही परत निघालो. त्यावेळी त्या भागातील आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी प्रविण धनवे यांच्या घरी गेलो. त्याच्या घरुन निघाल्यानंतर मारणे यांच्या घराजवळ आम्हाला चार – सहा लोकांनी थांबवले. त्यांनी चहा पिण्यासाठी बोलवले. आम्हाला तोपर्यंत कोणाची काहीच पार्श्वभूमी माहिती नव्हती. त्यावेळी माझा सत्कार करण्यात आला. तोपर्यंत गजानन मारणे कोण हे मला माहीत नव्हते. नंतर दोन तासांनी संबंधित व्यक्ती माहिती कळाली. तो एक “अपघात” होतो. कळत न कळत चूक झाली, असा दावा करून निलेश लंके यांनी वेळ मारून नेली.

अजित पवार गटाकडून टीका होत आहे, त्यावर बोलताना निलेश लंके म्हणाले, टीका करणे हे त्यांचे कामच आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले पाहिजे. गजा मारणे कोण होता, हे मला माहिती नव्हते. मला त्या व्यक्तीची ओळखच नाही. माझ्या मतदार संघात एक गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती नाही, त्यामुळे निवडणुकीत गजा मारणेची मदत झाल्याचा प्रश्नच येत नाही, असा दावाही निलेश लंके यांनी केला. पण गजा मारणेने केलेला सत्कार निलेश लंके यांच्या चांगलाच अंगलट आला.

अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी खासदार निलेश लंकेवर जोरदार हल्लाबोल केला. समाजसेवक म्हणून मिरवणारे खासदार निलेश लंके हे गजानन मारणेला भेटले. त्यामुळे त्यांची खरी प्रतिमा राज्यासमोर आली आहे. इतकेच नाही निलेश लंकेचे कार्यकर्ते एमआयडीसीमधून कशा पद्धतीने खंडणी गोळा करतात हे सर्वांना माहिती आहे, असा दावा उमेश पाटील यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button