महाराष्ट्र

महिला चालकांच्या हातात आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिकेचे स्टेअरिंग

नाशिक : सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या गोंडस बाळासह जन्मदात्रीला घरी सुखरूप पोचविण्याची जबाबदारी आता महिला चालकांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत मोठ्या रुग्णवाहिकांवर पहिल्यांदाच महिलांची चालक म्हणून नियुक्ती झाली आहे. सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने सोपविलेली ही जबाबदारी समर्थपणे पेलण्याचे काम या रुग्णवाहिका चालक लिलया करीत आहेत.

महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला नाही असे क्षेत्र विरळच. अगदी वैमानिक, अंतराळवीर इतकेच नव्हे, तर राष्ट्रपती पदावरही महिला विराजमान झाल्या. असे असूनही काही क्षेत्रांमध्ये संधी आणि कौशल्यांअभावी महिला स्वत:ला सिद्ध करू शकत नाहीत, हे वास्तव आहे. परंतु, सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू झाल्यानंतर आता सरकारी खात्यांमध्ये चालक पदावरही महिला दावा सांगू लागल्या आहेत. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवासी वाहतुकीसाठी महिला चालकांच्या हाती बसचे स्टेअरिंग सोपविले. आता आरोग्य विभागानेही महिलांना रुग्णवाहिकेवर चालक म्हणून संधी दिली आहे. नाशिक विभागात सरळसेवा भरतीत चालकांची एकूण २८ पदे भरण्यात आली. त्यापैकी सहा चालक महिला आहेत. यापैकी तीन महिलांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, तर प्रत्येकी एका चालक महिलेला मालेगाव, जळगाव आणि नंदुरबारमध्ये रुग्णवाहिकेवर नियुक्ती देण्यात आली आहे. नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये माधवी नायर (साळवे), आरती भटकर आणि सीमा शिंदे या तीन महिला माता आणि बाळांना रुग्णालयातून घरी सोडण्याची जबाबदारी पार पाडत आहेत.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रसूती झालेल्या महिला कोणत्या भागातील आहेत याचा अंदाज घेऊन त्यांना घरापर्यंत सोडण्यासाठीचा मार्ग निश्चित केला जातो.
जिल्ह्याच्या हद्दीमधील शेवटच्या गावातील मातेला तिच्या घरापर्यंत सोडण्याची जबाबदारी पूर्ण केली जाते.
सकाळी नऊ ते सायंकाळी सात यावेळेत दररोज साधारणत: १५० ते २०० किलोमीटरपर्यंत या रुग्णवाहिकांचा प्रवास होतो.
किमान पाच माता, त्यांची बालके आणि प्रत्येक मातेसोबतचा एक नातलग यांना १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून घरापर्यंत सोडण्यात येते.
अगदी पेठ, हरसूल, सुरगाणा, कळवण, नांदगावपर्यंत या मातांना सोडण्यात येते.

केंद्र सरकारच्या जननी-शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत प्रसूती पश्चात माता व तिच्या बाळाला घरापर्यंत सुरक्षितरित्या सोडण्याचे काम या महिला चालक करीत आहेत. पहिल्यांदाच मोठ्या रुग्णवाहिकांवर महिला चालक सेवा देताना लोकांना दिसतील.– डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक

माता आणि बाळांना त्यांच्या घरापर्यंत सोडण्याचे वेगळेच समाधान आहे. महिला रुग्णवाहिका चालवतेय याकडे ग्रामीण भागातील लोक कुतुहलाने पाहतात. सन्मानाने वागवतात. एकावेळी चार-पाच माता, त्यांचे बाळ आणि सोबतचा प्रत्येकी एक नातेवाईक यांना घरापर्यंत सोडते.– माधवी नायर (साळवे), रुग्णवाहिका चालक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button