शालेय शिक्षण विभागाचा ‘महावाचन उत्सव २०२४’ उपक्रम; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
पुणे : वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव २०२४’ हा उपक्रम २२ जुलै ते ३० ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसिडर) म्हणून निवड करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
शालेय शिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाचन अत्यंत आवश्यक आहे. वाचनामुळे त्यांच्या अभ्यासाच्या गतीमध्ये वाढ होते. वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात भर पडते. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्रातील वाचन चळवळ हा उपक्रम राबवण्याचा निर्णय २२ नोव्हेंबर २०२३ रोजी घेण्यात आला होता. या उपक्रमात ६६ हजार शाळा आणि ५२ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. रीड इंडिया सेलिब्रेशन या संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव २०२४’ हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वाचन संस्कृतीला प्रोत्साहन, विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे, मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृतीशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणे, विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला आणि भाषा संवाद कौशल्याला चालना देणे, दर्जेदार साहित्य आणि लेखकांचा परिचय करून देणे, ही उद्दिष्टे समोर ठेवून ‘महावाचन उत्सव २०२४’ हा उपक्रम राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची उपक्रमाचे सदिच्छादूत म्हणून निवड करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. उपक्रमात तिसरी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे. त्यासाठी तिसरी ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी ते बारावी असे तीन गट करण्यात आले आहेत. सहभागी सर्व विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकावरील त्यांचे विचार लिखित आणि चित्रफितीच्या स्वरुपात ‘महावाचन उत्सव २०२४’च्या संकेतस्थळावर अपलोड करतील. तसेच तालुकास्तरावर ग्रंथप्रदर्शनही आयोजित करण्यात येईल. समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत तीन कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.