महाराष्ट्र

सिडकोची ४८ भूखंड, २१८ दुकान विक्री योजनेच्या ऑनलाइन नोंदणीस सुरुवात

पनवेल : विधिमंडळात सिडकोच्या कारभार आणि भूखंड विक्रीवर भ्रष्टाचाराचे आरोप आमदार गणेश नाईक यांनी केल्याने सिडकोची भूखंड विक्री चर्चेत आली होती. आधिवेशन संपताच सिडको मंडळाने निवासी वापरासह उद्याोग व स्टार हॉटेलकरिता ४८ भूखंडांची आणि २१८ दुकानांच्या विक्रीसाठीची सोडत योजना जाहीर करुन सिडकोची भूखंड विक्री योजना नियमाप्रमाणेच सूरू असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेच्या ऑनलाइन नोंदणीस ६ जुलैपासून सुरुवात झाली असून दुकान विक्री योजनेच्या ऑनलाइन नोंदणीस १६ जुलै २०२४ पासून सुरुवात होणार आहे.

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा ८ महिन्यात सुरू होणार असल्याने नवी मुंबईतील जागेचे भाव वाढण्याची चिन्हे वर्तवली जात आहेत. अशातच सिडकोने भूखंड आणि दुकाने विक्री योजना जाहीर केली आहे. नवी मुंबईच्या घणसोली, नेरूळ, सीबीडी बेलापूर, खारघर, कोपरखैरणे, कळंबोली, पनवेल (पू.) आणि पनवेल (प.) नोडमधील हे भूखंड व दुकाने आहेत.सिडकोतर्फे शहरातील बांधकाम क्षेत्राला आणि वाणिज्यिक उपक्रमांना चालना देण्यासाठी भूखंड, दुकाने आणि वाणिज्यिक जागांच्या विक्रीच्या योजना राबविण्यात येतात. या वेळच्या योजनेमध्ये सर्वसामान्य नागरिकांना नवी मुंबईसारख्या शहरात स्वत:चे मनपसंत घर (बंगला) बांधण्याची सुवर्णसंधी लाभली आहे. तसेच दुकान विक्रीच्या योजनेतून व्यावसायिकांनाही आपल्या व्यवसाय वाढीची उत्तम संधी लाभली आहे.

विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको महामंडळभूखंड : सेवा उद्याोग आणि स्टार हॉटेल वापराकरिताचे ४८ भूखंड ई-निविदा, ई-लिलाव प्रक्रियेद्वारे विक्री केल्या जाणार आहेत. यासाठी गुंतवणूकदार https:// eauction. cidcoindia. com या संकेतस्थळावरुन माहिती घेऊ शकतील. ऑनलाइन नोंदणीचा कालावधी ८ ते २३ जुलैपर्यंत आणि योजनेचा निकाल २५ जुलैला जाहीर होणार आहे.

सिडकोच्या खारघर येथील स्वप्नपूर्ती गृहसंकुलासह नवी मुंबईतील तळोजा, कळंबोली, घणसोली, खारघर आणि द्रोणागिरी नोडमधील गृहसंकुलांतील २१८ दुकाने ई-निविदा तथा ई-लिलाव प्रक्रियेद्वारे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ई-निविदा तथा ई-लिलावात भाग घेणा-या इच्छुकांनी https:// eauction. cidcoindia. com या संकेतस्थळावर माहिती सिडकोने उपलब्ध केली आहे. या योजनेच्या ऑनलाइन नोंदणीस १६ जुलैपासून सुरुवात होणार असून योजनेचा निकाल २० ऑगस्टला जाहीर होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button