
वृत्तसंस्था : राज्यासह देशभरात टोलचा मुद्दा खूपच गंभीर आहे. अनेकदा वाहन चालकांना टोलसाठी मोठा वेळ खर्ची करून, वाहनाच्या रांगेत थांबावे लागते. मात्र, आता देशाचे केंद्रीय परिवहन आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील टोलव्यवस्थेबाबत मोठे भाष्य केले आहे. यापुढे देशातील वाहन चालकांना टोलसाठी थांबावे लागणार नाही. वाहनाच्या मीटरप्रमाणे पडलेल्या किलोमीटरच्या आधारे टोल आकारणी केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
केंद्रीय परिवहन आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या माहितीनुसार, सध्याची परंपरागत टोल वसुली करण्याची व्यवस्था संपुष्टात येणार आहे. त्याऐवजी देशभरात नवीन उपग्रह आधारित टोल वसुली प्रणाली सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे तुम्ही घराबाहेर वाहन काढल्यानंतर, त्यावेळेपासूनच किलोमीटर नुसार नवीन टॅक्स प्रणालीद्वारे तुमचा टोल आपोआप कापला जाईल. अर्थात यासाठी तुमचे बँक खाते हे परिवहन विभागाशी जोडले जाणार आहे. विशेष म्हणजे पुढील दोन महिन्यात ही नवीन टोल प्रणाली लागू होणार असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामुळे वाहन चालकांचा वेळ वाचणार आहे.
परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, त्यांना सध्याची टोल व्यवस्था पूर्णपणे संपवायची आहे. यापुढे ऑटोमॅटिक टोल कट होणार असल्याचे ते म्हणाले आहे. आगामी दोन महिन्यामध्ये हे सर्व दोन महिन्यांमध्ये सुरु होणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी सांगितलं की, रस्त्याच्या वापरानुसार बँक खात्यातून पैसे कट केले जाणार आहेत. आपल्या या नवीन योजनेमुळे केंद्र सरकार टोल मुक्ती करणार असल्याचे त्यांने स्पष्ट केले आहे. यामुळे आता ग्राहकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.