
वृत्तसंस्था : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील अनेक राज्यांचे राज्यपाल बदलेले आहेत. महाराष्ट्रासह विविध राज्याचे राज्यपाल बदलण्यात आले आहे. तसेच भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही ज्येष्ठ नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या नव्या आदेशांनुसार महाराष्ट्राचे राज्यपाल हे सी. पी. राधाकृष्णन असणार आहे. सी. पी. राधाकृष्णन हे याआधी झारखंडचे राज्यपाल होते. याचबरोबर आता मराठी व्यक्ती राजस्थानची धुरा सांभाळणार आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली आहे.
डोक्यावर गांधी टोपी आणि अगदी साधी राहणीमान असलेले हरिभाऊ बागडे औरंगाबादचे नेते आहे. मातीतून कष्टाने वर आलेले नेते म्हणून हरिभाऊ बागडे यांची ओळख आहे. लहानपणी अगदी पेपर टाकण्याचं काम केलेले हरिभाऊ आता राज्यस्थानचे राज्यपाल झाले आहेत. मागील ६५ वर्षांपासून त्यांनी आरएसएसमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर आमदार, मंत्री आणि आता थेट राज्यपाल म्हणून हरिभाऊ बागडे कार्यरत होणार आहेत. बागडे यांनी १९८५ ला आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली. पाच वेळी त्यांनी सलग आमदार म्हणन काम केले. त्यानंतर त्यांची बिनविरोध निवड विधानसभा अध्यक्ष म्हणून झाली. त्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून देखील हरिभाऊ बागडे यांनी कार्यभार सांभाळला आहे. आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हरिभाऊ बागडे यांना राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले आहे.
राजस्थानचे राज्यपाल म्हणून हरिभाऊ बागडे यांची नियुक्ती करण्यात आले आहे. त्यानंतर हरिभाऊ बागडे यांनी प्रतिक्रिया दिली. बागडे म्हणाले, २७ जुलै सकाळी ८:४५ च्या सुमारास मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला. पंतप्रधान मला म्हणाले, हरिभाऊ काय चाललंय? मी त्यांना म्हटलं सर्व काही चांगलं चाललंय, एकंदरीत बरं चाललंय. त्यावर ते मला म्हणाले, तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर जायचं आहे. त्यांनी मला इतकंच सांगितलं आणि म्हणाले, ही गोष्ट कोणाला सांगू नका, मी लवकरच तुमच्याशी संपर्क साधेन. त्यानंतर काही वेळाने माझी राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती होणार असल्याची बातमी समोर आली.