
वृत्तसंस्था : अयोध्या येथील राममंदिराची ओळख जगभरात झाली आहे. त्यानुसारच आता दक्षिण पूर्व आशियातील लाओस या देशाने अयोध्येतील श्री रामलल्ला यांच्यावर टपाल तिकीट जारी केले आहे. लाओसने केवळ रामलल्लाचीच नव्हे तर भगवान बुद्धांचीही टपाल तिकिटे आणली आहे. याबाबतची माहिती भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिली आहे. डॉ. एस. जयशंकर हे आशियाई-भारत मंत्रिस्तरीय परिषद, पूर्व आशिया शिखर परिषदेच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक आणि आशियाई प्रादेशिक मंच बैठकीसाठी व्हियनतियानेच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्यात अनेक आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. यात बौद्ध धर्मामुळे भारत आणि लाओसमध्ये शतकानुशतके चांगले संबंध आहेत. त्यामुळे लाओस या देशाने बुद्धांसह अयोध्येतील श्रीरामलल्ला यांच्यावर टपाल तिकीट जारी केले आहे.
लाओ पीडीआर (लाओ पीपल्स डेमोक्रेटिक रिपब्लिक) हा अयोध्या स्टॅम्प जारी करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. दरम्यान, बौद्ध धर्माच्या सामायिक सांस्कृतिक खजिन्याचा उत्सव साजरा करण्यासाठी एक विशेष तिकीट संच सुरू करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.