कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस हवालदारावर कोयत्याने हल्ला; हल्लेघोर दोघेजण पोलिसांच्या ताब्यात

सातारा : सातारा मध्यवर्ती आगार परिसरात रात्री सव्वा दहाच्या दरम्यान दुचाकीवरून आलेल्या तिघांना हटकल्याच्या रागातून तेथे कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस हवालदारावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री घडली आहे. या हल्ल्यामध्ये दत्ता पवार हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्याची सातारा शहर पोलिसांनी गंभीर दखल घेत अवघ्या काही तासाच्या आत या प्रकरणातील दोघांना ताब्यात घेतले आहे. हे दोघेजण आकाशवाणी झोपडपट्टी परिसरातील युवक असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दत्ता पवार हे बस स्थानक परिसरातील पोलीस चौकीमध्ये कर्तव्य बजावत होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी संग्रहालय इमारतीच्या परिसरात तिघे युवक एका दुचाकीवरून नाक्याच्या दिशेने जात असताना पवार यांनी त्यांना हटकले. त्याचा राग आल्याने या युवकांनी आणखी काही जणांच्या मदतीने पवार हे बस स्थानकालगतच्या रिक्षा स्टँड परिसरात उभे असताना त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पवार गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी काही जणांनी पवार यांना तातडीने सातारा जिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे. त्यांच्या छातीवर जोरदार वार झाल्याने आठ टक्के पडले आहेत. अधिक उपचारासाठी त्यांना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलीस हवालदारावरच सशस्त्र हल्ला झाल्याने खळबळ निर्माण झाली होती. सातारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी तातडीने गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला पाचारण केले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी कसून तपास करत याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. हल्ला केलेले इसम हे आकाशवाणी झोपडपट्टीतील राहात असून, रात्री त्यांनी मद्य प्राशन केल्याची माहिती समोर येत आहे. पवार यांची प्रकृती स्थिर आहे मात्र स्टॅन्ड परिसरात पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याने सातारकर कसे सुरक्षित राहतील असा सवाल केला जात आहे