भाजपाची आगामी विधानसभेसाठी रणनीती; हिंदूत्व आणि हिंदू मतदारांवर लक्ष्य केंद्रीत
मुंबई : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाराष्ट्रात भाजप चांगलीच अक्टिव्ह मोडवर आली आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव होऊ नये यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यातील विविध ठिकाणी डॅमेज कंट्रोलसाठी बैठका सुरू आहे. मुंबईवर भाजपने विशेष लक्ष ठेवण्यास सुरूवात केली आहे. मुंबईतील ३६ मतदारसंघांसाठी भाजपने विशेष रणनीती आखल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भाजप हिंदू मतदारांना आकर्षित करत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठीही भाजपने हिंदू मतांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी रणनीती आखत असल्याची माहिती समोर आली आहे.उद्धव ठाकरेंना मात देण्यासाठी भाजप हिंदूत्व आणि हिंदू मतदारांवर लक्ष्य केंद्रीत करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप प्रत्येक मतदारसंघात फिरणार असून त्याचा एक अहवाल तयार करणार आहे. या अहवालाच्या आधारे कोणत्या मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला परवानगी द्यायची हे ठरवले जाणार आहे. तसेच कोणत्या मतदार संघात कोणत्या नव्या चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते, याबाबतही एक अहवाल तयार केला जाणार आहे. एकगठ्ठा मुस्लीम मतदारांवर मात करण्यासाठी हा प्रयोग करण्यासाठी भाजप काम करणार आहे. मुंबईमधील ३६ मतदारसंघातील सर्व हिंदू मतदार मतदानासाठी एकत्रितरित्या कसे बाहेर पडतील, या दृष्टीने याअहवालाच्या मदतीने विधानसभेसाठ रणनीती आखली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भाजप आता हिंदुत्त्वाचे कार्ड खेळणार आहे. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर भाजप राज्यात आक्रमक भूमिका घेणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप पदाधिकारी हिंदू मतदारांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. विशेष म्हणजे. उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणी आणि धारावीतल्या अरविंद वैश्य यांच्या हत्येमुळे भाजप आक्रमक आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतदारांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीला भरभरून मते दिल्याचे निकालावरून लक्षात आले. याशिवाय लोकसभा निवडणुकीत उत्तर भारतीय मतादारांनीही महाविकासा आगाडीला स्वीकारल्याचे पाहायला मिळाले. भाजपसाठी ही धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. त्यामुळे हिंदुत्त्ववादी मतांमध्ये फूट पडली आणि मुत्सद्दीपणे मुस्लीम मते महाविकास आघाडीत़े वळाली. त्यामुळे भाजपला आता नव्या मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.