वृत्तसंस्था : देशभरात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक पार पडली. त्यानंतर आता राज्यसभेच्या काही जागांसाठी निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या १२ रिक्त जागांच्या निवडणुकीची अधिसूचना जारी केली आहे. यासाठी ३ सप्टेंबर सायंकाळी निकाल जाहीर होईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २६ आणि २७ ऑगस्ट असणार आहे. राज्यसभेच्या १२ रिक्त जागांमध्ये आसाम २, बिहार २, महाराष्ट्र २ तसेच हरयाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, त्रिपूरा, तेलंगणा, ओडिशा येथील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. यामध्ये उदयनराजे भोसले हे सातारा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. तर केंद्रीय मंत्री पियूष गोयल हेदेखील लोकसभेवर निवडून गेले आहेत.
तसेच ज्योतिरादित्य शिंदे, के. सी. वेणूगोपाल, सर्बानंद सोनोवाल यांच्यासह एकूण १० विद्यमान सदस्य लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे आता दहा जागा रिक्त झाल्या आहेत. याशिवाय, दोन सदस्यांनी राजीनामे दिल्याने त्यांच्या जागा रिक्त झाल्या होत्या. या सर्व परिस्थितीनंतर आता या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. २१ ऑगस्ट ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे. तर गुरूवार, २२ ऑगस्ट २०२४ ला अर्जांची छाननी करण्यात येईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार, २६ ऑगस्ट २०२४ अशी असून मंगळवार ३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. या पोटनिवडणुकीची मतमोजणी त्याच दिवशी म्हणजे ३ सप्टेंबर २०२४ ला सायंकाळी ५ वाजेपासून सुरू होईल.