कारागृहातील कैद्यांच्या देखरेखीवर आता ‘हायटेक वॉच’; लावणार सीसीटीव्ही कॅमेरे
मुंबई : राज्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे तुरुंगातील कैद्यांची संख्याही वाढत आहे. या तुरुंगातील कैद्यांवर देखरेख अथवा लक्ष देण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. असे असताना राज्यातील कारागृहांमधील कैद्यांवर आता ‘हायटेक वॉच’ राहणार आहे. त्यानुसार, नाशिक, येरवडा, ठाणे आणि तळोजा येथील मध्यवर्ती कारागृहांमध्ये ‘एक्स-रे बेस फुल ह्यूमन बॉडी स्कॅनर’ लावण्यात येणार आहे. राज्यात ९ मध्यवर्ती कारागृहे असून, ३१ जिल्हा कारागृहे, १९ खुली कारागृहे, १ खुली वसाहत आणि १७२ दुय्यम अशी २३२ कारागृहे आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे राज्यातील कारागृहे क्षमतेपेक्षा अधिक भरली असून, या कैद्यांच्या देखरेखीवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे ठिकठिकाणी बसवले आहेत. मात्र, आता या सर्व कारागृहांची बंदिवान ठेवण्याची क्षमता सुमारे २४ हजार असून, प्रत्यक्षात या कारागृहांमध्ये जवळपास ४० हजार बंदिवान ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर येत असतो. या अडचणी लक्षात घेऊन २०१४ पासून कारागृहांमध्ये सीसीटीव्ही लावून कैद्यांच्या प्रत्येक हालचालींवर निगराणी ठेवली जाऊ लागली.
आता सर्व कारागृहांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा लागलेली आहे. त्यापलीकडे जाऊन तुरुंगातील सुरक्षा ही आधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. अमेरिका, इंग्लड यांसारख्या देशातील कारागृहात वापरले जाणारे बॉडी स्कॅनर हे उपकरण राज्यातील कारागृहात लावण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मिळाली. राज्यातील कारागृहांमध्ये ४५ कोटी ६४ लाख खर्चून बायोमेट्रिक ऍक्सेस सिस्टिम (फुल हाईट टर्नस्टील गेट), पॅनिक अलार्म सिस्टिम, कोटींचे टीव्ही डिस्प्ले आणि सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे तुरुंगातील सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम होऊन क्षमतेपेक्षा बंदिवान अधिक असतानाही त्यांच्या प्रत्येक हालचालींवर करडी नजर ठेवण्यास मदत होईल.