महाराष्ट्र

हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय; भांडणादरम्यान महिलेची केस ओढणं किंवा तिला ढकलणं हा विनयभंग नाही

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या एका सुनावणीदरम्यान न्यायालयाने सांगितलं आहे की, भांडणादरम्यान महिलेची केस ओढणं किंवा तिला ढकलणं हा विनयभंग नाही. बाबा धीरेंद्र शास्त्री उर्फ ​​बाबा बागेश्वर धाम यांच्या शिष्याशी संबधित एका खटल्यावर सुनावणी करताना हा निर्णय दिला आहे. बाबा बागेश्वर धाम यांचे अनुयायी आणि याचिकाकर्ते नितीन उपाध्याय यांनी काही आरोंपीविरोधात याचिका दाखल करत त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र खटल्याच्या सुनावणीवेळी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्यास नकार देत नितीन उपाध्याय यांची याचिका फेटाळून लावली. याचिकाकर्ते नितीन उपाध्याय यांनी दावा केला आहे की, अभिजीत करंजुले, मयूरेश कुलकर्णी, ईश्वर गुंजल, अविनाश पांडे आणि लक्ष्मण पंत या लोकांनी याचिकाकर्ते नितीन उपाध्याय यांना एक व्हिडिओ बनवण्यास सांगितले होतं, पण नितिन उपाध्याय यांनी व्हिडीओ बनवण्यास नकार दिल्याने, आरोपींनी नितीन उपाध्याय यांना मारहाण केली तसेच त्यांच्या पत्नीचे केस ओढले आणि तिला धक्का दिला. तसेच आरोपींनी नितीन उपाध्याय यांच्या मुलाला देखील चापट मारली. याप्रकरणी नितीन उपाध्याय यांनी पोलिसांत तक्रार दाखल करत आरोपींविरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या प्रकरणी आता न्यायालयात सुनावणी पार पडली असून भांडणादरम्यान महिलेची केस ओढणं किंवा तिला ढकलणं हा विनयभंग नाही, असा निकाल न्यायालयाने दिला आहे.

याचिकाकर्ते नितीन उपाध्याय महाराष्ट्रात बागेश्वर बाबा यांचे कार्यक्रम आयोजित करतात. याचिकाकर्ते नितीन उपाध्याय यांच्या म्हणण्यानुसार, ५ आरोपी ९ मे २०२३ रोजी त्यांच्या घरी आले. आरोपींनी नितीन उपाध्याय यांना बाबा बागेश्वर धाम एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी ३.५० कोटी रुपये मागत असल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सांगितले. त्यांनी व्हिडीओ तयार करण्यास नकार दिल्यावर, आरोपींनी नितीन उपाध्याय व त्यांच्या पत्नीला मारहाण केली. आरोपींनी त्यांच्या मुलांनाही चापट मारली. नुकतीच एक क्लिप व्हायरल झाली होती ज्यामध्ये बाबा कोणत्याही राज्यात कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ३.५० कोटी रुपयांची मागणी करतात असा आरोप करण्यात आला होता.

या संपूर्ण प्रकारानंतर नितीन उपाध्याय यांनी पोलिसांत तक्रार दाखल करत आरोपींविरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या प्रकरणी आता न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने म्हटलं आहे की, विनयभंगाचा उद्देश एखाद्या महिलेच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवण्याचा हेतू असावा. केवळ केस ओढणे आणि गुन्हेगारी बळाचा वापर करणे म्हणजे विनयभंग होत नाही. गुन्हेगारी बल म्हणजे विनयभंग कसा होतो? गुन्हेगारी बळाचा वापर करून छेडछाड होऊ शकते का? यात छेडछाड करण्याचा हेतू कुठे आहे?

याप्रकरणी न्यायालयाने अभिजीत करंजुले, मयूरेश कुलकर्णी, ईश्वर गुंजल, अविनाश पांडे आणि लक्ष्मण पंत या आरोपींविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यास न्यायालयाने नकार दिला असून भारतीय दंड संहिता कलम ३२३ (साधारण दुखापत) आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button