आंतरराष्ट्रीय फ्रॉड कॉल सेंटरचा अलिबाग पोलिसांनी केला पर्दाफाश
अलिबाग : दिवसेंदिवस ऑनलाईन गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेक सर्वसामान्य लोकांसोबत फसवणुकीचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेक ऑनलाईन गुन्हेगारीचे गुन्हे हे पोलीस स्थानकात दाखल केले जात आहेत. दर दोन दिवसांमध्ये फसवणुक, जुगार अड्डे, खोट्या शेअर मार्केटची फसवणूक असे अनेक गुन्हे हे दाखल केले जात आहेत. तरुण विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींची फसवणूक करून त्याच्याकडून पैसे उकळणे अशा प्रकारचे अनेक गुन्हे दररोज समोर येत आहेत. असाच एक प्रकार आता अलिबागमधून समोर आला आहे. अलिबाग तालुक्यामधील परहूर येथील नेचर्स एज अलिबाग रिसॉर्टमधून अमेरिकेतल्या नागरिकांना गंडा घालण्याचे काम आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरच्या माध्यमातून केले जात होते. अलिबाग पोलिसांनी ऑनलाईन जुगार अड्डयाच्या संशयातून घातलेल्या धाडीत हा प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवारी २२ ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली. यात पन्नासहून अधिक तरुण सहभागी असल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत पोलिसांची कारवाई सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अमेरिकेतील नागरिकांना सेक्स सारख्या गोळ्या औषधे, उपकरणे यांचे आमिष दाखवून आंतरराष्ट्रीय कॉलिंग सेंटरद्वारे फसवणूक केली जात होती. नशेली पदार्थांचे सेवन करून रात्री उशिरापर्यंत हे कॉल सेंटर सुरू असायचे. अलिबाग पोलिसांना या रिसॉर्टमध्ये ऑनलाईन जुगार सुरू असल्याचा संशय आला. त्यासाठी पोलिसांनी गुरूवारी रात्री धाड टाकली. या धाडीत वेगळाच प्रकार सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. अधिक चौकशीत हे आंतरराष्ट्रीय कॉलिंग सेंटर असल्याचे उघड झाले. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी माहित देत या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.