नवी मुंबईत हेरॉईन हा अंमलीपदार्थ विक्री प्रकरणी; एका महिलेसह दोघांना अटक
नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी हेरॉईन हा अंमलीपदार्थ विक्री प्रकरणी दोन पुरुष आणि एका महिलेस अटक केले आहे. त्यांच्याकडे १०० ग्रॅम वजनाचे हेरॉईन आढळून आले असून त्याचे मूल्य वीस लाख आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे. तुर्भे एमआयडीसीतील प्रेमनगर येथील नवजीवन शाळेनजीक असणाऱ्या एका घरातून अंमली पदार्थ पुरवले जात आहेत अशी माहिती पोलीस हवालदार गणेश पवार यांना मिळाली. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस आयुक्त, भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत नायडु, पोलीस हवालदार रमेश तायडे, उत्तम लोंखडे, गणेश पवार, पोलीस शिपाई योगिता शेळके, अर्चना पाटील, अंनत सोनकुळ, या पथकाने या ठिकाणी छापा घातला. पथकाच्या हाती तीन आरोपी लागले असून त्यात एका महिलेचा समावेश आहे.
आरोपींकडे २० लाख रुपये किमतीचा १०० ग्रॅम वजनाचा हेरॉईन हा अंमली पदार्थ आढळून आला. त्यांच्याविरुध्द तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वसीम शेख करीत आहेत. या आरोपींची अंमली पदार्थ पुरवणारी साखळी असून अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांनी दिली.