विद्येच्या माहेरघरात पुन्हा गँगवॉर; राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या
पुणे : पुण्यामध्ये भर दिवसा गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक असलेल्या वनराज आंदेकर यांच्यावर नाना पेठ परिसरामध्ये आधी कोयत्याने वार करण्यात आला. वनराज आंदेकर यांच्यावर ५ राऊंड फायर करण्यात आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी केईम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नाना पेठेत आंदेकर टोळीचा दबदबा आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी ०१ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात हल्ला करण्यात आला. परिसरामध्ये ते थांबले असताना गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोराने पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरामध्ये एकच घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच समर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस आणि गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनराज यांच्यावर पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती पुणे पोलिसांनी दिली. मात्र गोळीबारामागचे नेमके कारण समजू शकले नाही. वर्चस्वाच्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली
पुण्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता पुन्हा एकदा शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये माजी नगरसेवकांवर हल्ला करण्यात आला आहे. नाना पेठेमध्ये टू व्हिलरवरुन येऊन वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करण्यात आला. ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना जवळ असणाऱ्या केईएम रुग्णालयामध्ये तातडीने दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोर फायरिंग करुन लगेच फरार झाले आहेत. या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींची नावे समोर आली आहेत. त्यातील एक संशियत आरोपी गणेश कोमकर हा कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांचा जावई आहे. त्यामुळे आंदेकरांची हत्या घरगुती कारणामुळे झाल्याची चर्चा आहे.
वनराज यांचा खून त्यांच्या सख्ख्या दाजीने केला आहे. गणेश कोमकर आणि जयंत कोमकर यांच्यासह दोन सख्ख्या बहिणींना पोलिसांनी अटक केली आहे. वनराज यांच्या बहिणीचा आणि वनराज यांचा घरगुती वाद होता. आंदेकरनी कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिले होते. पण, ते दुकान पुणे मनपाने अतिक्रमण कारवाईमध्ये पाडले. त्याच रागातून सख्ख्या दाजीने वनराज आंदेकरची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. सख्ख्या बहिणीनेच वनराज आंदेकर यांना पोलिस ठाण्यात पोलिसांसमोर थेट जीवे मारण्याची धमकी दिली होती. वनराज, ‘आम्ही तुला जगु देणार नाही. तु आमच्यामधे आला आहेस. तु आमचे दुकान पाडण्यास सांगुन आमच्या पोटावर पाय देतोस काय? तुला आज पोर बोलावुन ठोकतेच.’ असे धमकावले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी वनराजची खरोखरच हत्या झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
कोण आहेत वनराज आंदेकर ?
वनराज आंदेकर पुणे महानगरपालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. तर, वनराज आंदेकर यांच्या मातोश्री राजश्री आंदेकर २००७ आणि २०१२ मध्ये दोनवेळा नगरसेविका होत्या. त्यासोबतच वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकांत आंदेकर हेसुद्धा नगरसेवक राहिले होते.