महिलांची छेडछाड कराल तर सावधान…पुणे पोलीस देणार ‘ही’ लाजिरवाणी शिक्षा
पुणे : वैभवशाली गणेशोत्सवाला प्रचंड गर्दी होत असते. राज्यासह देशभरातून भाविक येतात. पण, गर्दीत महिला-तरुणींची छेड काढण्याच्या घटनाही घडतात. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आगळी-वेगळी युक्ती राबवत छेडछाड काढणाऱ्यांचे फोटो फ्लेक्सद्वारे भरचौकात लावले जातील. एवढेच नाही तर त्यांची परेड देखील घेतली जाणार आहे. त्यामुळे महिलांची छेडछाड कराल तर सावधान असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. पुण्यातील वैभवशाली गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. उत्सव पाहण्यासाठी देश विदेशातून नागरिक येतात विशेषकरून मध्यवस्तीत मोठी गर्दी होते. या गर्दीत महिला-तरुणींची छेड काढण्याचे प्रकार घडत असतात. दरम्यान या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी यंदा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आगळी-वेगळी भूमिका घेतली असून, महिला व तरुणींच्या सुरक्षेला प्राधान्य देत यंदा हा प्रयोग राबविण्याचे ठरविले आहे.
दामिनी पथक तसेच गुन्हे शाखेची पथके यासाठी सलग दहा दिवस मध्यभागात गस्त व पेट्रोलिंग घालणार आहेत. पथके महिलांसोबत गैरकृत्य करताना कोणी आढळून आल्यास त्यांचे फोटो काढून फ्लेक्सवर नावासह लावणार आहेत. तसेच त्यांची रस्त्यावर परेड काढणार आहेत. दरम्यान, पोलीस कोठडीत असलेल्या आरोपी ठेवण्यासाठी विश्रामबागचे लॉकअप आहे. गणेशोत्सव काळात गर्दीमुळे या आरोपींना ने-आण करताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे यंदा दहा दिवस लष्कर पोलीस ठाण्यात असलेल्या लॉकअपमध्ये सर्व आरोपींना ठेवले जाणार आहे.
यंदा १८ मदत केंद्र : गणेशोत्सवात यंदा येणाऱ्या भाविकांसाठी तसेच सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून अठरा मदत केंद्र उभारण्यात येणार आहेत. मध्यवस्तीत २४ तास ही मदत केंद्रे सुरु राहणार आहेत. केंद्रावर स्थानिक पोलीस ठाणे, विशेष शाखा, गुन्हे शाखा, वाहतूक विभाग यांचे अधिकारी कर्मचारी काम करणार आहेत.
सहा ठिकाणी शीघ्र कृतीदले तैनात : गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणूकीचा रस्ता तसेच प्रमुख परिसरात पोलिसांच्या शीघकृतीदलाची ६ पथके तैनात असणार आहेत. त्यासाठी मचान बांधण्याची व्यवस्था देखील पोलिसांनी केली आहे. १० दिवस पथके उंचावरून सर्व हालचालींवर नजर ठेवणार आहेत.
मोबाईल, पाकीटमार चोरट्यांचा बंदोबस्त : पुण्यात दरवर्षी गणेशोत्सवात मोबाईल चोरांचा सुळसूळाट असतो. चोर्या करण्यासाठीच काही परराज्यातून चोरटे पुण्यात येतात. शेकडो मोबाईल चोरीला जाण्याचा घटना घडतात. त्यासोबतच दागिने व पाकिटमारी देखील मोठ्या प्रमाणत होते. त्यापार्श्वभूमीवर यंदा गुन्हे शाखेकडे खास जबाबदारी देण्यात आली असून, गुन्हे शाखा अशा चोरट्यांची माहिती काढून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे.