निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार राज्यात तब्बल १६ लाख मतदार वाढले
मुंबई : लोकसभेनंतर आता राज्यात विधानसभा निवडणूक लवकरच घेतली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच आता निवडणूक आयोगानेही तयारी सुरु केली असून, लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील मतदार नोंदणीत तब्बल १६ लाख ९७ हजार ३६८ मतदार वाढल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने याबद्दलची आकडेवारी जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतीय निवडणूक आयोगाने ६ ते २० ऑगस्ट यादरम्यान मतदार यादी अपडेट करण्याचे काम हाती घेतले होते. यात नवीन मतदारांची नोंदणी करणे, मतदारांची नावे, पत्ते आणि अन्य तपशील दुरुस्त करण्याच्या कामांचा समावेश होता. त्यासोबतच मृत्यू झालेले मतदार, कायमचे स्थलांतर याबद्दलही तपशील अपडेट करण्यात आला.
६ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीमध्ये राज्यात एकूण ९ कोटी ३६ लाख ७५ हजार ९३४ इतके मतदार होते. पण, मतदार पुनर्रिक्षण कार्यक्रमात २० लाख ७८ हजार ८१ नव्या मतदारांचे अर्ज आले. यात ८ लाख ८० हजार ६७६ पुरूष मतदार तर ११ लाख ९७ हजार २४० महिला मतदारांचा समावेश होता.
मतदारांच्या वाढत्या संख्येत पुणे जिल्हा सर्वाधिक मतदार असणारा जिल्हा ठरला आहे. त्यापाठोपाठ मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात ८६ लाख ४७ हजार १७२ मतदार आहेत. तर मुंबई उपनगरमध्ये ७५ लाख ८२ हजार ८६६ आणि ठाणे जिल्ह्यात ७० लाख ७ हजार ६०६ मतदार आहेत.
निवडणूक आयोगने जाहीर केलेल्या अंतिम मतदार यादीत महाराष्ट्रात मतदारांची संख्या ९ कोटी ५३ लाख ७४ हजार ३०२ इतकी झाली आहे. यात ४ कोटी ९३ लाख ३३३ हजार ९९६ पुरुष तर ४ कोटी ६० लाख ३४ हजार ३६२ महिला मतदार आहेत. तर ५ हजार ९४४ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.