वृत्तसंस्था : देशात आज पहिल्यांदाच ‘वंदे भारत मेट्रो’ ट्रेन धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज देशातील पहिल्या ‘वंदे भारत मेट्रो’ ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ही नवी वंदे भारत मेट्रो ट्रेन गुजरातमधील अहमदाबाद ते भुज दरम्यान धावणार आहे. दिल्ली आणि मुंबईसह देशातील इतर शहरांमध्ये धावणाऱ्या मेट्रो ट्रेनप्रमाणे या ट्रेनची रचना करण्यात आली आहे. मात्र, स्पीडमध्ये तर ही ट्रेन सर्वात सुपरफास्ट असणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी झारखंडमध्ये ६ नवीन ‘वंदे भारत ट्रेन’ ला हिरवा झेंडा दाखवला. मुसळधार पावसामुळे पंतप्रधानांनी जमशेदपूर दौरा रद्द केला होता. हा दौरा रद्द करण्यात आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी रांची विमानतळावरूनच ऑनलाईन माध्यमातून विविध योजनांचे उद्घाटन केले. या पावसामुळे जमशेदपूरमधील रोड शोही रद्द करण्यात आला. दरम्यान, झारखंडच्या जलद विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. मोदींनी झारखंडमध्ये सहा वंदे भारत ट्रेनला सुरुवात करण्याशिवाय २१ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही केली.
भारतीय रेल्वेने विकसित केलेली वंदे भारत मेट्रो ही सेमी-हाय-स्पीड ट्रेन असणार आहे. ही ट्रेन १०० ते २५० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार आहे. जास्तीत जास्त प्रवाशांना आरामात बसण्यासाठी या ट्रेनमध्ये तीन-तीन बेंच-प्रकारची आसन सुविधा देण्यात आली आहे. दिव्यांग प्रवाशांचीही काळजी घेण्यात आली आहे, त्यांच्यासाठी डब्यात व्हिलचेअर शौचालयाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वेने ‘वंदे भारत मेट्रो’ मध्ये प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत टॉक-बँक सिस्टम उपलब्ध करून दिली आहे. ज्याद्वारे प्रवासी आपत्कालीन परिस्थितीत थेट ट्रेन चालकाशी बोलू शकतात. प्रत्येक डब्यात एकूण १४ सेन्सर यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाणार आहे.