६० वर्षीय व्यक्तीची अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून अँसिड फेकण्याची धमकी
मुंबई : धारावी येथे १५ वर्षीय मुलीवर अत्याचार करून चाकूचा धाक दाखवणाऱ्या ६० वर्षीय व्यक्तीला धारावी पोलिसांनी अटक केली. आरोपीने पीडित मुलीला अँसिड फेकण्याचीही धमकी दिली. याप्रकरणी आरोपीविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण(पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी घरात एकटी असताना आरोपी घरात शिरला. आरोपीने तिला चाकुचा धाक दाखवला. त्यात ती जखमी झाली. आरडाओरडा केल्यास ठार मारण्याची धमकीही त्याने दिली. आरोपीने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर कोणालाही काही सांगितल्यास अँसिड फेकण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरली होती. तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी धारावी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलीस पथकाने आरोपीला राहत्या परिसरातून ताब्यात घेतले. त्याला पोलीस ठाण्यात आणून याप्रकरणी अटक करण्यात आली. आरोपी पीडित मुलीच्या कुटुंबियांचा परिचित आहे. याप्रकरणी धारावी पोलीस अधिक तपास करीत आहेत.